Maharashtra Weather news : देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये थंडीचा कडाका दिवसागणिक वाढताना दिसत आहे. काश्मीर आणि नजीकच्या क्षेत्रांमध्ये पर्वतीय भागांवर बर्फाची चादर पाहायला मिळतेय, तर हिमाचल आणि तत्सम क्षेत्रातही थंडीची चादर पाहायला मिळत आहे.
उत्तरेकडे सक्रिय झालेल्या याच थंडीचे परिणाम महाराष्ट्पापर्यंत दिसू लागले आहेत. मागील काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रापुरता सीमीत असणारी थंडी आता राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हजेरी लावताना दिसत आहे. कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र मात्र यास अपवाद ठरत असून, इथं पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. पुढील 24 तासांमध्ये कोकण, सातारा आणि कोल्हापूरातील काही भागांमध्ये हवामान विभागानं मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवत यलो अलर्ट जारी केला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तापमानाचा आकडा चढत्या क्रमात असून, इथं पहाटेच्या वेळी असणारा हलका गारवा वगळता थंडीचा लवलेषही नाही. तर, नाशिक, पाचगणी, कोल्हापुरातील काही भाग आणि राज्यातील घाटमाथ्यावरील क्षेत्रामध्ये किमान तापमानात घट होत असल्यानं थंडी इथं जोर धरताना दिसेल. सध्याच्या घडीला राज्यातील रायगड, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, लातूर इथं विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं या प्रणालीच्या परिणामस्वरुप कोकण किनारपट्टी भागासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वादळी वाऱ्यांसह राज्यात पावसाची हजेरी असेल. ज्यामुळं तापमानाचही चढ-उतार अपेक्षित आहेत.
यंदाच्या वर्षी पावसानं मोठा मुक्काम ठोकला. एव्हाना पावसानं माघार घेऊन राज्यात थंडीचा शिरकाव होणं अपेक्षित असतं. पण, यंदा मात्र चित्र वेगळं आहे. देशाच्या उत्तरेकडेच थंडीला उशिरानं सुरुवात झाल्यामुळं महाराष्ट्रातही कडाक्याच्या थंडीला अद्याप अवकाश असल्याचं सांगितलं जात आहे. असं असलं तरीही गिरीस्थानांवर सध्या वातावरणात सुखद गारवा पाहायला मिळतोय ही बाबही नाकारता येत नाही.