मुंबई : कोरोनाच्या महामारीमध्ये एक चांगली बातमी समोर आली आहे. इटलीमधील शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, कोरोना व्हायरस नष्ट होऊ शकेल असं लेझर उपकरण तयार करण्यात आलं आहे. हे उपकरण संयुक्त राष्ट्राच्या वैज्ञानिकांनी इटालियन टेक कंपनीच्या वैज्ञानिकांच्या सहकार्याने बनवलं आहे. उत्तरेकडील इटालियन शहर ट्रीस्ट इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनियरींग अँड बायोटेक्नोलॉजी आणि लेजर उपकरणं बनवणाऱ्या स्थानिक कंपनी अल्टेक के-लेझर यांनी गेल्या वर्षी या प्रकल्पाचं काम सुरू केलं होतं.
'डेली पायनियर' च्या अहवालानुसार, हे लेसर डिव्हाइस कोरोना विषाणूला नष्ट करू शकतं. या डिव्हाइसमध्ये, हवा लेसर बीममधून जाते आणि यामुळे व्हायरस आणि बॅक्टेरिया नष्ट होतात.
यासंदर्भात माहिती देताना, इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनियरींग अँड बायोटेक्नोलॉजीच्या कार्डियोव्हास्क्यूलर बायोलॉजी ग्रुपचे प्रमुख सेरेना झाकिनिया म्हणाल्या, "या उपकरणाने लेसर तंत्रज्ञानाबद्दल माझे विचार पूर्णपणे बदलले आहेत. हे डिव्हाइस 50 मिलिसेकंदात विषाणू नष्ट करू शकतं."
दरम्यान यावर बऱ्याच शास्त्रज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, लेझर-आधारित तंत्रज्ञान कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी सुरक्षित होणार नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जर्नल ऑफ फोटोकॅमिस्ट्री अँड फोटॉबियोलॉजीमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, लेसर-आधारित उपकरणामुळे कॅन्सरचा धोका असतो असं लक्षात आलं आहे.
दुसरीकडे अल्टेक कंपनीचे संस्थापक फ्रान्सिस्को जनाटा आणि जॅकिन्या हे दोघं लेसर उपकरणांमुळे कॅन्सरच्या थिएरीचं खंडन करतात. त्यांचा असा विश्वास आहे की डिव्हाइसमधून निघणारे लेसर मानवी त्वचेच्या संपर्कात कधी येत नाही, म्हणून कॅन्सर होण्याचा धोका नाही. हे उपकरण पूर्णपणे सुरक्षित असून ते रिसाइकिल प्रोडेक्ट आहे असंही त्यांनी म्हटलंय.