नोएडा : कोरानाच्या या कठीण काळात बोकारो येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने मैत्रीचे उदाहरण लोकांसमोर ठेवले आहे. आपल्या मित्राचा जीव वाचवण्यासाठी देवेंद्र नावाच्या या व्यक्तीने झारखंडमधील बोकारो ते नोएडापर्यंत 1400 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आणि योग्य वेळी ऑक्सिजन सिलिंडर मित्रापर्यंत पोहचवला.
देवेंद्र औद्योगिक टाऊनशिपच्या सेक्टर 4 मध्ये राहतो आणि तो पेशाने शिक्षक आहे. त्याचवेळी त्याचा मित्र रंजन अग्रवाल दिल्लीतील आयटी कंपनीत नोकरी करतो आणि सध्या तो नोएडामध्ये राहत आहे. देवेंद्रने सांगितले की, त्याला त्याच्या मित्राला कोरोना संसर्ग झाल्याची माहिती मिळाली आणि त्याला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला समजले की, रंजनची ऑक्सिजन पातळी सतत खाली येत आहे, आणि त्याच्यासाठी ऑक्सिजनची व्यवस्था केली जाऊ शकत नाही.
तेथील डॉक्टरांनी सांगितले की, रंजनचा जीव वाचवण्यासाठी ऑक्सिजनची व्यवस्था करावी लागू शकते. देवेंद्र यांच्या म्हणण्यानुसार, प्रथम त्याने नोएडामध्ये ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला पण, जेव्हा ऑक्सिजन त्याला मिळाला नाही, तेव्हा त्याने रविवारी दुपारी आपली कार काढली आणि नोएडाच्या दिशेने निघाला.
देवेंद्रने सांगितले की, बोकारोमध्येही ऑक्सिजन सिलिंडर मिळवणे इतके सोपे नाही. देवेंद्र अनेक ऑक्सिजन पुरवठादारांशी बोलला पण त्यांनी सांगितले की, त्यांना ऑक्सिजन भरण्यासाठी एका रिक्त सिलिंडरची आवश्यकता आहे.
देवेंद्रने धैर्य सोडले नाही आणि प्रयत्न करत राहिला. त्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने दुसर्या मित्राच्या मदतीने बोकारो येथील झारखंड स्टील ऑक्सिजन प्लांटच्या ऑपरेटरला भेट दिली आणि त्याची गरज सांगितली. तेव्हा त्या प्लांटच्या संचालक राजेशने त्यांना मदत केली, परंतु त्या सिलिंडरचे पैसे डिपॅाझीट म्हणून जमा करण्याची अट त्यांनी ठेवली. तेव्हा देवेंद्रने जंबो सिलिंडरसाठी 10 हजार रुपये दिले. त्यापैकी 9 हजार 600 रुपये केवळ सिलिंडरचे परत करावे म्हणून घेण्यात आले होते, तर ऑक्सिजनची किंमत केवळ 400 रुपये होती.
सिलिंडर मिळाल्यामुळे तो नोएडा दिशेने निघाला, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर पोलिसांनी त्यांना दोनदा रोखलं, पण देवेंद्रने आपल्या मित्राच्या प्रकृतीबद्दल पोलिसांना सांगून पुढे जाण्याची परवानगी घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र म्हणाला, "माझा मित्र आता स्थिर आहे. तो पूर्णपणे बरा होईपर्यंत मी नोएडामध्येच राहीन."