'जेएनयू'ची पोर हुश्शार.... 'इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस'च्या ३२ पैकी १८ जागा पटकावल्या

गेल्या काही दिवसांपासून जेएनयू विद्यापीठातील वातावरण प्रचंड तापले आहे.

Updated: Jan 14, 2020, 03:44 PM IST
'जेएनयू'ची पोर हुश्शार.... 'इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस'च्या ३२ पैकी १८ जागा पटकावल्या

नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC)घेण्यात आलेल्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस (IES) परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. भारतीय आर्थिक सेवेत दरवर्षी ३२ पदांची भरती केली जाते. यासाठी यंदा घेण्यात आलेल्या परीक्षेअंती ३२ पदांपैकी १८ जागांवर दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू (JNU) विद्यार्थ्यांची निवड झाली.

काही दिवसांपूर्वी 'जेएनयू'मध्ये गुंडांनी विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला केला होता. यानंतर 'जेएनयू'मधील वातावरण प्रचंड तापले आहे. यादरम्यान अनेकांनी 'जेएनयू'मधील विद्यार्थ्यांच्या पात्रतेविषयी शंका उपस्थित केल्या होत्या. मात्र, इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस परीक्षेच्या निकालांनी या टीकाकारांना चांगलीच चपराक बसली आहे. 

'जेएनयू'चा अंशुमन कमलिया या परीक्षेत अव्वल गुणांनी उत्तीर्ण झाला. ओडिसाच्या अंशुमनने 'जेएनयू'मधून M.Phil चा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. 

जेएनयू विद्यापीठा हे देशातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. संशोधन आणि शिक्षणाच्या चांगल्या दर्जासाठी हे विद्यापीठ कायमच नावाजले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये विद्यापीठात झालेल्या आंदोलनांमुळे आणि राजकारणामुळे अनेकांनी 'जेएनयू'ची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसच्या परीक्षांचे निकाल पाहता अजूनही 'जेएनयू'तील शैक्षणिक दर्जा उत्तम असल्याचे सिद्ध झाले आहे.