सकाळी नाश्त्यात चपाती किंवा पराठा खात असाल तर ही बातमी नक्की वाचा!

पराठा खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

Updated: Oct 14, 2022, 05:25 PM IST
सकाळी नाश्त्यात चपाती किंवा पराठा खात असाल तर ही बातमी नक्की वाचा! title=

देशात एकसमान वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रणालीला या वर्षी जुलैमध्ये पाच वर्षे पूर्ण झाली, पण तिची गुंतागुंत संपण्याचे नाव घेत नाहीये. जीएसटीची (GST) अंमलबजावणीवरुन सातत्याने वाद होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. असाच काहीसा प्रकार चपाती (Roti) आणि पराठ्यावरील (Paratha) वेगवेगळ्या जीएसटी दरांबाबत झाला आहे. त्यामुळे जर आता तुम्हाला हॉटेल किंवा बाहेर पराठा (Paratha) खायचा असेल तर आता 18 टक्के जीएसटी (GST) भरावा लागणार आहे. पण चपाती खायची असेल तर त्यावर फक्त पाच टक्के कर लागणार आहे. बाजारातून चपाती खरेदी करून खाल्ल्यास पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (GST)आकारला जाणार आहे. पण पराठ्यावर 18 टक्के जीएसटी (GST) भरावा लागणार आहे. अहमदाबादमधील एका फ्रोझन फूड सर्व्हिस कंपनीला त्यांच्या फ्रोझन (frozen) म्हणजे पॅकेज्ड/रेडी-टू-कूक पराठ्यांवर 18 टक्के जीएसटी लावण्यास सांगण्यात आले आहे, तर चपातीवर पूर्वीप्रमाणेच पाच टक्के जीएसटी लागू होईल.

फ्रोजन चपाती-पराठ्यांवरील जीएसटीबाबत यापूर्वीही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या उद्योगाशी संबंधित कंपन्यांचे म्हणणे आहे की दोन्ही बनवण्याचे मूळ साहित्य गव्हाचे पीठ आहे, त्यामुळे त्यावर समान जीएसटी लागू झाला पाहिजे. वाडीलाल इंडस्ट्रीजने सांगितले की ते 8 प्रकारचे पराठे बनवतात. यामध्ये प्रामुख्याने पिठाचा वापर केला जातो. मलबार पराठ्यात पिठाचे प्रमाण 62 टक्के आणि मिश्र भाजीपाला असलेल्या पराठ्यात प्रमाण 36 टक्के आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, गुजरात अपील अथॉरिटी फॉर अॅडव्हान्स रुलिंग (GAAAR) ने वाडीलालला सांगितले आहे की तुमच्या गोठवलेल्या चपातीवर पूर्वीप्रमाणे 5 टक्के जीएसटी (GST) लागू होईल. पण पराठा 18 टक्के जीएसटीच्या (GST) श्रेणीत येईल. 15 सप्टेंबर रोजी, गुजरात अपील अथॉरिटी फॉर अॅडव्हान्स रुलिंगने  चपाती आणि फ्रोझन/पॅकेज केलेले पराठा यातील फरक स्पष्ट केला.

जून 2021 मध्ये, गुजरातच्या अॅडव्हान्स डिसिजन अथॉरिटी (GAAR) ने पॅकेज केलेले पराठे स्वतंत्र खाद्यपदार्थ म्हणून 18 टक्के  जीएसटी श्रेणीत आणण्याचे आदेश दिले होते. पराठा तयार करण्यासाठी तीन ते चार मिनिटे लागतात.या प्रक्रियेतील गहू 36 ते 62 टक्के असतो. त्यामुळे ते चपातीपेक्षा वेगळ्या खाद्य श्रेणीमध्ये येते. म्हणून त्यावर स्वतंत्र श्रेणी म्हणून जीएसटी देखील आकारला जावा, असे अॅडव्हान्स डिसिजन अथॉरिटीने म्हटलं आहे.

या आदेशाविरुद्ध वाडीलाल यांनी अपील अथॉरिटी फॉर अॅडव्हान्स रुलिंग (GAAAR) मध्ये अपील केले होते. फूड कंपन्यांशी निगडित कंपन्यांप्रमाणेच चपातीप्रमाणे पराठाही गव्हापासून बनवला जातो, असेच त्यांचे म्हणणे होते.  मात्र जवळपास 20 महिन्यांच्या लढ्यानंतर एएएआरने एएआरचा आदेश कायम ठेवला आहे. एएएआरने सांगितले की साधी चपाती बनवण्यासाठी फक्त गहू आणि पाणी लागते, तर पराठ्यामध्ये बटाटा, मुळा, कांदा, तेल आणि मीठ असते.

याआधीही, गुजरात एएएआरने सामान्य दूध आणि फ्लेवर्ड दूध वेगळ्या GST श्रेणींमध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यात त्यांनी म्हटले होते की, फ्लेवर्ड दूध हे सामान्य दुधापेक्षा वेगळे आहे, त्यामुळे त्यावर 12 टक्के जीएसटी लावावा, तर सामान्य दूध या श्रेणीतून बाहेर ठेवले पाहिजे.