उत्तर प्रदेशातील कासगंज येथे भीषण अपघात झाला आहे. ट्रॅक्टर-ट्रॉली तलावात कोसळून झालेल्या या अपघातात 22 यात्रेकरुंचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. तसंच 10 जण जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे सर्व यात्रेकरुन गंगा नदीत पवित्र स्थान करण्यासाठी कादरगंजला निघाले होते. माघ पौर्णिमेच्या निमित्ताने हे सर्व भाविक चालले होते. पण रस्त्यातच कासगंज येथ त्यांचा अपघात झाला.
अलिगड रेंजचे महानिरीक्षक शलभ माथूर यांनी सांगितलं आहे की, "ट्रॅक्टर चालक दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी झाली. यानंतर ती 7 ते 8 फूट खोल तलावात गेली". अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरु केलं. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं.
मुख्य वैद्यकीय अधिकारी रवी अग्रवाल यांनी सांगितलं आहे की, "कासगंजमधील अपघातात 22 जणांचा मृत्यू झाला आहे. 5 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, दोघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जवळपास 10 लोक जखमी झाले आहेत".
जनपद कासगंज में सड़क दुर्घटना में हुई जनहानि अत्यंत हृदय विदारक है। मेरी संवेदनाएं शोकाकुल परिजनों के साथ हैं।
जिला प्रशासन के अधिकारियों को सभी घायलों के समुचित निःशुल्क उपचार हेतु निर्देश दिए हैं।
प्रभु श्री राम से प्रार्थना है कि दिवंगत आत्माओं को शांति तथा घायलों को शीघ्र…
— Yogi Adityanath (@myogiadityanath) February 24, 2024
कासगंडच्या जिल्हाधिकारी सुधा वर्मा यांनी अपघात झाला तेव्हा ट्रॅक्टरमध्ये 30 लोक होते अशी माहिती दिली आहे. "एटाहून काही भाविक आज सकाळी कासगंजला जात असताना ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली. अपघात झाला तेव्हा ट्रॉलीमध्ये 25-30 लोक बसले होते. गावकऱ्यांनी पीडितांना वाचवलं आहे," असंही त्यांनी सांगितलं.
मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50000 रुपये सरकारकडून देण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली असून त्यात लिहिलं आहे की, "कासगंज जिल्ह्य़ातील अपघातात झालेली जीवितहानी अत्यंत हृदयद्रावक आहे. कुटुंबाप्रती माझ्या संवेदना आहेत. सर्व जखमींवर योग्य ते मोफत उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत," अशी माहिती त्यांनी दिली आहे.