खोदकामात मजुरांना 240 सोन्याची नाणी सापडली; 4 पोलिसांनाच झाली अटक कारण...

240 British Era Gold Coins Unearthed At Construction Site: गुजरातमधील एका इमारतीच्या बांधकामासाठी खोदकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही सोन्याची नाणी सापडली होती. मात्र या प्रकऱणाला नंतर रंजक वळण मिळालं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 29, 2023, 03:48 PM IST
खोदकामात मजुरांना 240 सोन्याची नाणी सापडली; 4 पोलिसांनाच झाली अटक कारण... title=
प्रकरणाला रंजक वळण मिळालं (प्रातिनिधिक फोटो)

240 British Era Gold Coins Unearthed At Construction Site: मध्य प्रदेशमधील अळीराजपूर जिल्ह्यामध्ये शनिवारी एका पोलीस निरिक्षकासहीत एकूण 4 पोलीस कर्मचाऱ्यांनाच अटक करण्यात आली. येथे एका विचित्र प्रकरणामध्ये या पोलीस कर्मचाऱ्यांनीच अपहार केल्याची माहिती समोर आली आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांनी आदिवासी कामगारांना मिळालेले सोन्याची नाणी लुटल्याचा आरोप करण्यात येत असून याच आरोपाअंतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे. 2 आदिवासी कामगारांनी ही सोन्याची नाणी गुजरातमधील एका अंडर कंस्ट्रक्शन इमारतीच्या खोदकामादरम्यान सापडली होती. या कामगारांना 240 सोन्याची नाणी मिळाली होती. ही सर्व नाणी ब्रिटीशकालीन असल्याचं सांगितलं जात आहे. या 240 नाण्यांपैकी या आदिवासी कामगारांकडे केवळ एकच नाणं शिल्लक राहिलं आहे.

नेमकं घडलं काय?

घडलेल्या घटनाक्रमानुसार, पोलीस कर्मचारी सोन्याची नाणी सापडलेल्या कामगाराच्या घरी गेले आणि त्यांनी ही नाणी बळजबरी, दमदाटी करत लुटली. या कामगारांनी केलेल्या आरोपानुसार साध्या कपड्यांमधील 4 पोलीस कर्मचारी 19 जुलै रोजी बळजबरीने रामकू नावाच्या व्यक्तीच्या घरात घुसले. त्यांनी या घरातील एका कोन्यामध्ये गाडून ठेवलेली नाणी उकरुन बाहेर काढली आणि ती घेऊन निघून गेले. याच आरोपांनुसार 4 पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असून त्यांनी अटकेनंतरही या सोन्याच्या नाण्यांचं काय केलं हे सांगितलेलं नाही. सोन्याची नाणी असलेल्या या पिशवीची सध्याच्या दरानुसार किंमत कोट्यवधी रुपये असल्याची माहिती समोर येत आहे. 

नाणी कुठे आहेत हे सांगितलंच नाही

सोन्याची नाणी असलेला हा खजिना अजूनही गायब असून अटक केल्यानंतर केवळ एक नाणं पोलिसांना रिकव्हर करता आलं आहे. हे नाणंही या कामगारांकडूनच रिकव्हर करण्यात आलं असल्याने चोरलेली सर्व 239 नाणी कुठे आहेत हे या 4 पोलीस कर्मचाऱ्यांनाच ठाऊक आहे. चोरी करणाऱ्या या 4 पोलीस कर्मचाऱ्यांनी ही नाणी कुठेतरी लपवून ठेवल्याची शंका उपस्थित केली जात आहे. कामगारांकडून ताब्यात घेतलेलं एक नाणं पोलिसांनी इंदूरमधील पुरातत्व विभागाकडे सुपूर्द केलं आहे.

बातमी वाऱ्यासारखी पसरली

रामकू भयदिया आणि त्यांच्या सूनेला सोन्याची ही नाणी त्यावेळी मिळाली जेव्हा ते गुजरातमधील एका इमारतीच्या खोदकामाअंतर्गत मजूरी करत होते. त्यांनी सापडलेल्या या नाण्यांबद्दल कोणालाही सांगितलं नाही. त्यानंतर ते गुजरातच्या सीमेजवळील सोंडवा या आपल्या गावी परत आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी 20 नाणी बाहेर ठेऊन उरलेली 240 नाणी घरातील एका कोपऱ्यात पुरुन ठेवली. मात्र या दोघांना सोन्याची नाणी सापडल्याची बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरली. 

एकच नाणं वाचवता आलं

गावकऱ्यांनी केलेल्या आरोपानुसार साध्या कपड्यांमध्ये आलेल्या 4 पोलीस कर्मचाऱ्यांनी 19 जुलै रोजी बळजबरीने रामकूच्या घरामध्ये प्रवेश केला. सोन्याची नाणी जमीनीमधून बाहेर काढली. "पोलिसांनी 239 नाणी घेऊन पळ काढला. आम्हाला केवळ एकच नाणं वाचवता आलं," असं रामकूने म्हटलं आहे. दुसऱ्याच दिवशी रामकूने तक्रार दाखल केली. प्रकरण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर चारही आरोपी पोलिसांना सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.