Raj Thackeray Rally In Khadkhwasala: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी पुण्यातील खडकवासला येथे जाहीर सभा घेतली. येथील मतदारसंघामधील पक्षाचे उमेदवार मयुरेश वांजळे यांच्या प्रचारासाठी राज यांनी ही सभा घेतली. या सभेमध्ये राज यांनी पुण्यातील परिस्थितीवर भाष्य करताना, "पुण्याचा झालेला सत्यानाश पाहून वाईट वाटतं" असं म्हटलं आहे. यावेळेस राज ठाकरेंनी, "मी तुमच्याकडे महाराष्ट्राची सत्ता मागतोय, मी जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवेन," असंही म्हटलं आहे. मात्र माजी सहकारी आणि 2009 साली पहिल्याच निवडणुकीमध्ये आमदार झालेले रमेश वांजळेंच्या मुलासाठी प्रचार करताना राज ठाकरे आठवणींमध्ये रमले. दिवंगत रमेश वांजळे हे मृत्यूपूर्वी राज ठाकरेंशी काय बोलले होते याचा खुलासा त्यांनी केली. तसेच मयुरेश वाजंळेही वडिलांसारखेच दिसतात आणि राहतात असंही राज म्हणाले.
"खरंच मनापासून सांगतो की पुण्याचा झालेला सत्यानाश पाहून वाईट वाटतं. पण तुम्हाला त्याचं वाईट वाटत नाही, राग येत नाही हे पाहून मला जास्त वाईट वाटतं. एकदा तुमच्या हातातील फोनमध्ये डोकावून जग कुठे गेलं आहे ते... आपण रस्ते, पाणी, गटारं यातच अडकलो आहोत. पण याचा तुम्हाला राग येत नाही. जगाच्या मागे आपण किती पडलो आहोत याचं आपल्याला काही वाटत नाही हे वाईट आहे," असं म्हणत राज ठाकरेंनी आपली खंत व्यक्त केली. "आज पुण्यात आयसिस, सिमीसारख्या संघटनांचे अतिरेकी सापडत आहेत. पण याकडे कोणाचंच लक्ष नाही. आमदार खासदारांना फक्त टेंडर काढायची आहेत, आणि त्यातून पैसे कमवायचे आहेत, त्यांना इतर गोष्टींशी घेणंदेणं नाही, आणि तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नये म्हणून ते तुम्हाला जातीत गुंतवतात," असंही राज म्हणाले.
"तुम्ही इतकी वर्ष ज्यांना मतदान केलं त्यांनी तुमचं जगणं हराम करून ठेवलं आहे. आज महाराष्ट्रातील अनेक मुलं हा देश सोडून निघालेत. शिक्षण, नोकऱ्या त्यांना इथे पण मिळू शकतात, पण ते का चाललेत, कारण आजूबाजूचं वातावरण घाणेरडं आहे. मला या सांगा या असल्या महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज झटले?" असा सवाल राज यांनी उपस्थितांना विचारला. "ज्या हिंद प्रांतावर महाराष्ट्राने राज्य केलं, त्या महाराष्ट्राला मला गतवैभव मिळवून द्यायचा आहे. इतर पक्षातील जी लोकं निवडणुकीला उभे आहेत, त्यांच्या डोळ्यात महाराष्ट्राबद्दलची कोणीतीही स्वप्न नाहीत. उद्या सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा येत आहे. त्यात आपण महाराष्ट्रापुढचे प्रश्न आणि त्याची उत्तरं दिली आहेत," असंही राज यांनी भाषणात म्हटलं.
भाषणाच्या सुरुवातीलाच राज यांना रमेश वांजळेंची आठण झाली. त्यांनी मृत्यूच्या काही मिनीटं आगोदर रमेश वांजळे आपल्याशी फोनवर बोलले होते असं सांगताना नेमकं काय बोलणं झालेलं हे ही सांगितलं. "माझा मित्र, सहकारी रमेश वांजळेंचा मुलगा मयुरेश याचा प्रचार करायला मी इकडे आलो आहे. मला तो दिवस अजून आठवतोय. रमेश शेवटचा कोणाशी बोलला असेल तो माझ्याशी बोलला, त्याने मला फोन केला आणि म्हणाला मी एमआरआय काढायला आलोय, तो झाला की फोन करतो. आणि थोड्यावेळाने मला फोन आला की तो गेला. मला काय बोलायचं ते कळेना. मला अनेक जणं सोडून गेले पण आज माझा रमेश असता तर मला सोडून गेला नसता. मयुरेश मला रमेशची आठवण करून देतो. आकाराने पण तसाच आहे आणि सोन्याने मढलेला पण तसाच आहे. त्यामुळे तुम्ही जे मतदान कराल ते मयुरेशला कराल तसंच मतदान तुम्ही रमेशला पण कराल," असं भावनिक आवाहन राज ठाकरेंनी केलं.
"मी तुमच्याकडे महाराष्ट्राची सत्ता मागतोय, मी जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवेन. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की मयुरेश वांजळे, आणि माझे पुरंदरचे उमेदवार उमेश जगताप आणि महाराष्ट्रातील माझ्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा," असं राज यांनी भाषणाच्या शेवटी म्हटलं.