लॉकडाऊन : ५ वर्षाच्या चिमुकल्याचा एकट्याने दिल्ली ते बंगळुरु विमान प्रवास

3 महिन्यांनंतर आईशी भेट...

Updated: May 25, 2020, 05:55 PM IST
लॉकडाऊन : ५ वर्षाच्या चिमुकल्याचा एकट्याने दिल्ली ते बंगळुरु विमान प्रवास title=
फोटो सौजन्य : ANI

नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून देशात विमान सेवा बंद होती. मात्र आजपासून विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मार्च महिन्यापासून देशभरात घोषित केला. लॉकडाऊनमध्ये सर्व प्रवासी वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे सर्वच जण जिथे आहेत तिथेच अडकून पडले. देशांतर्गत विमान सेवा सुरु झाल्यानंतर लोकांनी आपल्या कुटुंबियांकडे परत जाण्यासाठी विमान प्रवास सुरु केला. असाच एका 5 वर्षांचा चिमुकला आपल्या घरी जाण्यासाठी विमानातून दिल्लीहून बंगळुरुसाठी रवाना झाला.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आज दिल्लीतून विमान प्रवास करण्यासाठी 5 वर्षांचा विहान शर्मा हा चिमुकलाही सामिल होता. विहानने विशेष यात्री श्रेणीमध्ये एकट्याने दिल्ली ते बंगळुरुपर्यंतचा प्रवास केला. त्याची आई कँपेगोडा या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपल्या मुलाला घेण्यासाठी आली होती. 'माझ्या 5 वर्षाच्या मुलाने एकट्याने दिल्लीपासून प्रवास केला आहे. तो तीन महिन्यांनंतर बंगळुरुमध्ये परत आला आहे,' असं विहानच्या आईने सांगितलं.

बंगळुरु विमानतळावर सकाळी 9 पर्यंत पाच विमानं आली. तर 17 विमानं बंगळुरु विमानतळावरुन रवाना झाली. बंगळुरुतून 9 विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली. दुसरीकडे दिल्ली विमानतळावरुन 82 विमानांची उड्डाणं झाली.

नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल सोडून सोमवारपासून देशांतर्गत उड्डाणं पुन्हा सुरू करण्यात येत आहेत. आंध्र प्रदेशमध्ये उड्डाणांची सुरुवात 26 मे तर पश्चिम बंगालमध्ये 28 मेपासून होणार आहे.