Government Jobs : एखादी ओळखीतील व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये रुजू झाली, की अनेकदा त्या व्यक्तीचं कौतुक सुरूच राहतं. थोडक्यात सरकारी नोकरीविषयी वाटणारं अप्रूप आजही कायम आहे. इथं मिळणारा पगार, सुट्ट्या आणि सुविधा पाहता एखाद्या कर्मचाऱ्याला आणि काय हवं? असाच प्रश्न उरतो. तुमचं कोणी सरकारी नोकरी करतंय का? काय म्हणता तुम्हीच सरकारी नोकरी करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी.
जर तुम्ही केंद्र सरकारच्या अख्त्यारित येणाऱ्या एखाद्या खात्यात नोकरी करता तर, ही बातमी तुम्हाला आनंद देऊन जाणार आहे. केंद्र सरकारच्या वतीनं कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या नावे जुलै महिन्यासाठी DA आणि DR ची घोषणा सप्टेंबर महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे. हो, पण पुढील वर्षी लागू होणाऱ्या डीएसंदर्भातील घोषणा मात्र येत्या दोन दिवसांतही केली जाऊ शकते. लेबर मिनिस्ट्रीकडून जुलै महिन्यासाठीचा AICPI इंडेक्स 31 ऑगस्टला जारी करण्यात येणार आहे.
केंद्राकडून वर्षातून दोन वेळा डीए वाढीची घोषणा केली जाते. पहिल्या घोषणेच्या धर्तीवर जानेवारी महिन्यात कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळते. जिथं त्यांचा महागाई भत्ता वाढतो तर, दुसऱ्यांदा डीए वाढीची घोषणा झाल्यानंतर 1 जुलै रोजी कर्मचाऱ्यांना ही पगारवाढ मिळते. पण, ही घोषणा मात्र काहीशी उशिरानंच केली जाते. त्यामुळं अनेकदा कर्मचाऱ्यांचाही गोंधळ उडतो.
सहसा महागाई भत्ता AICPI इंडेक्सच्या आकडेवारीवर निर्धारित केला जातो. जानेवारीपासून जूनपर्यंत AICPI इंडेक्सच्या आधारे आकडे पाहायचे झाल्यास महागाई भत्त्याचा आकडा 3 अंकांनी पुढे आहे. पण, शासनाकडून इथं दशांश ग्राह्य धरलं जात नाही. परिणामी अशी आशा आहे की यंदा डीए 3 टक्क्यांनी वाढून 42 वरून तो 45 टक्क्यांवर पोहोचेल. असं असलं तरीही कर्मचाऱ्यांनी मात्र 4 टक्के डीए वाढीची मागणी उचलून धरली आहे. पण, इथं त्यांचा काही अंशी हिरमोड होण्याची चिन्हं आहेत.
7th Pay Commission च्या धर्तीवर डीएमागोमाग कर्मचाऱ्यांच्या HRA मध्येही वाढ होणार आहे.पण, महागाई भत्ता ज्यावेळी 50 टक्कांचा आकडा ओलांडेल तेव्हाच ही वाढ होणार आहे. त्यासाठी किमान 6 महिन्यांचा वेळ दवडला जाऊ शकतो. सध्या हा एचआरए शहरांनुसार विभागला गेला आहे. यामध्ये X, Y, Z अशी नावंही देण्यात आली आहेत. यामध्ये X शहरांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना जास्तीचा एचआरए दिला जातो. तर, वाय आणि झेड विभागातील कर्मचाऱ्यांना तुलनेनं कमी एचआरए दिला जातो.