Gurugram Rape Case: आपल्याच जन्मदात्या आईवर बलात्कार (Rape) करुन तिला आत्महत्येस (Suicide) भाग पाडणाऱ्या आरोपी मुलाला कोर्टाने जन्माची अद्दल घडवली आहे. गुरुग्राम (Gurugram) न्यायालयाच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी आईवर बलात्कार करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याला जन्मठेपेची (life imprisonment) शिक्षा सुनावली आहे. न्यायमूर्ती राहुल बिष्णोई यांनी त्याला 20 हजारांचा दंडही ठोठावला आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, न्यायमूर्तींनी निर्णय सुनावताना म्हटलं की, फिर्यादीचा मुलगा या नात्याने त्याने तिचं संरक्षण करणं अपेक्षित होतं. पण त्याने तिला त्रास दिला आणि एका जनावराप्रमाणे वागत हे भयानक कृत्य केले. यामुळे महिलेसमोर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता.
पोलिसांच्या माहितीनुसार, 16 नोव्हेंबर 2020 रोजी आरोपीच्या आईने हरियाणाच्या पतौडी परिसरातील घरात गळफास घेत आत्महत्या केली. यानंतर महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आत्महत्या करण्यासाठी तिला प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
पतीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मोठा मुलगा ड्रग्जच्या आहारी गेला असून अनेकदा कुटुंबीयांसोबत भांडण करतो. 20 वर्षांपूर्वी पतीचं निधन झाल्यानंतर महिलेने आपल्या दीराशी लग्न केलं होतं.
दरम्यान शवविचछेदन करण्यात आलं असता महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असं पोलिसांनी सांगितलं आहे. यानंतर 21 नोव्हेंबर 2020 रोजी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली. पोलिसांनी कोर्टात तब्बल 18 साक्षीदारांची साक्ष नोंदवली. यादरम्यान आरोपीविरोधात करण्यात आलेले आरोप खरे असल्याचं सिद्ध झालं.