माकडांना अद्दल घडवण्यासाठी कुत्र्यालाच केलं वाघ

सोशल मीडियावर फोटो व्हायरल 

Updated: Dec 2, 2019, 06:35 PM IST
माकडांना अद्दल घडवण्यासाठी कुत्र्यालाच केलं वाघ  title=

मुंबई : सुगीच्या दिवसांमध्ये आपल्या धान्याचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक शेतकरी ना ना तऱ्हेरे प्रयत्न करत असतो. माकड आणि पक्ष्यांना हाता तोंडाशी आलेल्या पिकांपासून खूप लांब ठेवावं लागतं. अशावेळी शेतकरी अनेक उपाय करत असतात. कर्नाटकातील एका शेतकऱ्यांचे असेच प्रयत्न सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. शेतकऱ्याने आपल्या कुत्र्यालाच वाघासारखं रंगवून हैदोस घालणाऱ्या माकडांना शेतीपासून लांब ठेवलं आहे.

कर्नाटकातील शिवामोगा येथील श्रीकांत गौडा असं या शेतकऱ्याचं नाव आहे. हा शेतकरी माकडांच्या हैदोसाने हैराण झाला होता. या त्रासाला कंटाळून काही तरी रामबाण उपाय शोधण्यासाठी शेतकऱ्याचे प्रयत्न सुरू झाले. शेतकऱ्याने आपल्या कुत्र्याच्या शरिरावर वाघासारखे चट्टे ओढले. त्याच्या कुत्र्याला हुबेहुब वाघासारखं केलं. जेणे करून शेतीचं नुकसान करणारी माकडं लांब राहतील. 

श्रीकांत यांना ही कल्पना शेजारच्या शेतकऱ्याकडून मिळाली. शेजारच्या शेतकऱ्याने खेळण्यातला वाघ शेतात आणून उभा केला. हीच युक्ती श्रीकांतने ही वापरायचा विचार केला. पण कल्पना फार काय मदत करणार नाही हे देखील त्याच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी आपल्या कुत्र्यावर वाघासारखे चट्टे दिले. आणि कुत्रा शेतात सोडून दिला.  विशेष म्हणजे त्यांची ही कल्पना यशस्वी ठरली. या कुत्र्याला पाहून तो खरंच वाघ असल्याचं माकडांना वाटलं आणि त्यांनी शेतात येणं बंद करुन टाकलं.

महत्वाचं म्हणजे श्रीकांत यांनी कुत्र्याला कोणतीही इजा होऊ नये यासाठी डायचा वापर केला होता. डायचा हा रंग महिन्याभरामध्ये उतरु लागला. त्यामुळे पुन्हा माकडं येतील या भीतीने श्रीकांत यांनी कुत्र्याचे फोटो काढून ते शेतात ठिकठिकाणी लावले आहेत.