Accident News: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एक भीषण अपघात झाला आहे. बस्ती जिल्ह्यातील कप्तानगंज-दुबौलिया मार्गावर झालेल्या या अपघातात एका चिमुरड्याचा करुण अंत झाला आहे. बोलेरोने (Bolero) धडक दिल्यानंतर बाईकला (Bike) भीषण आग लागली. यामुळे चार वर्षाच्या चिमुरड्याचा जिवंत जळून मृत्यू झाला. अपघातात दुचाकी चालवणाऱ्याचा मृत्यू झाला आहे तर एक व्यक्ती जखमी झाला आहे. या अपघातानंतर परिसरात शोककळा पसरली आहे.
बोलेरोने धडक दिल्यानंतर बाईकला गाडीमध्येच अडकली होती. यानंतर बोलेरोसह बाईक रस्त्यावरुन फरफटत गेली. रस्यावर फरफटत असल्याने बाईकमधून आगीच्या ठिणग्या पडू लागल्या होत्या. यानंतर काही वेळाने बाईकला आग लागली. या आगीत वर्षाचा चिमुरडा जिवंत जळाला. चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकी चालवणाऱ्याचाही मृत्यू झाला आहे. तर एक व्यक्ती जखमी झाला आहे.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले असून याप्रकरणी तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रखिया गावातील निवासी दिनेश कुमार शेरवाडीह येथे एका लग्नात सहभागी होण्यासाठी आला होता. तिथे त्याचे अनेक नेतावाईकही उपस्थित होते. रविवारी रात्री 8.30 वाजता दिनेश आपला नातेवाईक अरविंद आणि चार वर्षाच्या कार्तिकला घेऊन फिरण्यासाठी बाईकवरुन बाहेर निघाला होता. अरविंद यावेळी बाईक चालवत होता.
दरम्यान, कप्तानगंज-दुबौलिया मार्गावर वेगाने येणाऱ्या एका बोलेरोने बाईकला जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर बाईक बोलेरोमध्येच अडकली होती. यानंतर बोलेरो बाईकला फरफटत पुढे घेऊन गेली. यादरम्यान दिनेश आणि अरविंद बाईकवरुन बाजूला फेकले गेले, पण चिमुरडा कार्तिक मात्र बाईकमध्येच अडकला होता.
याचदरम्यान, बाईकमधून ठिणग्या बाहेर पडल्या आणि काही वेळात तिने पेट घेतला. तिथे उपस्थित लोक चिमुरड्याला वाचवण्यासाठी धावत आले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. कार्तिक आगीत पूर्पणणे होरपळला होता. ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, लोकांनी पाहिलं असता दुचाकी चालवणारा अरविंदही ठार झाला होता. दिनेश अजून जिवंत असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी दिनेश आणि कार्तिक यांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. दरम्यान, चिमुरड्याच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.