'माझी अधिकारी पत्नी रोज 6 लाखांची वसुली करते', पतीनेच केला भांडाफोड; सोपवली 100 पानांची डायरी, प्रत्येक पानावर...

Jyoti Maurya UP Crime: बरेलीमधील (bareilly) प्रांतीय नागरी सेवा (Provincial Civil Service) अधिकारी ज्योती मौर्य (Jyoti Maurya) सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत आहेत. यादरम्यान, एक 100 पानांची डायरी समोर आली आहे. ज्योती यांच्या पतीनेच ही डायरी समोर आणली असून यामध्ये ज्योती मौर्य दर महिन्यात केल्या जाणाऱ्या वसुलीचा सगळा लेखाजोखा मांडत असे.  

शिवराज यादव | Updated: Jun 22, 2023, 06:37 PM IST
'माझी अधिकारी पत्नी रोज 6 लाखांची वसुली करते', पतीनेच केला भांडाफोड; सोपवली 100 पानांची डायरी, प्रत्येक पानावर... title=

UP Crime News in Marathi: बरेलीमधील (bareilly) प्रांतीय नागरी सेवा (Provincial Civil Service) अधिकारी ज्योती मौर्य (Jyoti Maurya) सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत आहेत.  याप्रकरणी सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. यादरम्यान, एक 100 पानांची डायरी समोर आली आहे. ज्योती यांच्या पतीनेच 'दैनिक भास्कर'कडे ही डायरी सोपवली आहे. ज्योती मौर्य दर महिन्यात केल्या जाणाऱ्या वसुलीचा सगळा लेखाजोखा या डायरीत मांडत असे. डायरीत उल्लेख केला आहे त्यानुसार ज्योती दर महिन्यात अनधिकृतपणे 6 लाखांची वसुली करत होत्या. 

ज्योती यांनी केलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे तर आता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. ज्योती यांचे पती आलोक मौर्य यांनी याप्रकरणी होमगार्ड मुख्यालयात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी केलल्या तक्रारीनंतर होमगार्डचे डीजी व्ही के मौर्य यांनी प्रयागराजचे डेप्युटी कमांडंट जनरल संतोष कुमार यांच्याकडे तपास सोपवला आहे. त्यांनी पती आलोक यांचा जबाब नोद करुन घेतला आहे. आता बरेली साखर कारखान्यात व्यवस्थापकीय संचालक पदावर स्थित महिला अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. 

प्रत्येक पानावर लिहिलं आहे शुभ लाभ

प्रयागराजच्या पंचायतराज विभागात तैनात असणारे आलोक कुमार मौर्य यांनी दिलेल्या डायरीच्या प्रत्येक पानावर वर आणि खाली स्वस्तिक चिन्ह काढण्यात आलं आहे. तसंच त्यावर शुभ-लाभ लिहिण्यात आलं आहे. यानंतर त्यावर प्रत्येक पानावर कोणाकडून किती पैसे मिळाले याचा उल्लेख करण्यात आला आहे. हे हस्ताक्षर ज्योती यांचं असल्याचं आलोक यांचा दावा आहे. 

ऑक्टोबर 2021 मध्ये 6 वाख 4 हजारांची कमाई
 

ज्योती मौर्य यांची 2019 ते 2021 दरम्यान कौशांबीच्या चैल तहसीलमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. डायरीत यादरम्यान भ्रष्टाचारातून मिळणाऱ्या पैशांचा हिशोब लिहिण्यात आला आहे. फक्त ऑक्टोबर 2021 बद्दल बोलायचं झाल्यास, ज्योती यांनी फक्त एका महिन्यात 6 लाख 4 हजार रुपये अनधिकृतपणे कमावले होते. 

यामध्ये दर महिन्याला 15 हजार रुपये सप्लाय इन्स्पेक्टर आणि 16 हजार मार्केटिंग इन्स्पेक्टरला दिले जात असल्याचाही उल्लेख आहे. प्रत्येक पानावर महिन्यानुसार भ्रष्टाचारातून मिळणाऱ्या पैशांचा उल्लेख आहे. 

"2020 पर्यंत सर्व काही ठीक होतं"

आलोक यांनी सांगितलं आहे की, 2010 मध्ये त्यांचं ज्योती यांच्याशी लग्न झालं होतं. 2009 मध्ये, आलोकची पंचायत राज विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून निवड झाली होती. यानंतर त्यांनी ज्योतीला शिकवले. तिला प्रशिक्षण दिलं. 2015 मध्ये ज्योतीची निवड झाली. लोकसेवा आयोगातून ज्योती यांना महिलांमध्ये तिसरा आणि एकूण 16 वा क्रमांक मिळाला होता. कुटुंबातील सर्वजण खूप आनंदी होते. 2015 मध्ये जुळ्या मुलींचा जन्म झाला. 2020 पर्यंत सर्व काही ठीक होतं.

"फेसबुकवरुन जिल्हा कमांडंट होमगार्डशी मैत्री"

आलोक यांनी सांगितलं की, 2020 मध्ये ज्योतीची गाजियाबादमध्ये तैनात जिल्हा कमांडंट होमगार्डशी ओळख झाली. दोघांमध्ये बोलणं होऊ लागलं. अधिकारी असल्याने आम्हाला त्यात काही वावगं वाटलं नाही. पण 2022 मध्ये ज्योती मोबाइलवर फेसबुक लॉग इन करुन विसरली होती. मी पाहिलं असता दोघांमध्ये अश्लील संवाद झाले होते. हे पाहून माझा संताप झाला. मी विरोध केला असता ती भांडू लागली आणि जेलमध्ये पाठवण्याची धमकी देऊ लागली. 22 डिसेंबर 2022 मध्ये आलोकने लखनऊमधील हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं होतं. त्यानंतर दोघांनीही हल्ला केल्याने मी जीव वाचवून पळालो होतो असं आलोकचं म्हणणं आहे. 

"जीवे मारण्याची धमकी"

“एका आठवड्यापूर्वी मला फोन करून स्वेच्छेने घटस्फोट दे, अन्यथा मारून टाकेन असं सांगितलं. ती मला दररोज 376 मध्ये अडकवण्याची धमकी देते. पत्नीने धुमनगंज पोलिस ठाण्यात हुंडाबळीचा खोटा गुन्हा दाखल केला आहे. तसंच 376 लावण्याची धमकी दिली," असा आरोप आलोक यांनी केला आहे. 

होमगार्ड मुख्यालयात तक्रार

आलोक यांनी याप्रकरणी होमगार्डच्या मुख्यालयात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, माझी पत्नी ज्योतीचे गाझियाबादच्या होमगार्ड कमांडंटसोबत अफेअर आहे. दोघेही त्याला मारण्याचा कट रचत आहेत. यासंदर्भात त्यांनी काही व्हॉट्सअॅप चॅटही होमगार्ड अधिकाऱ्यांना दिले आहेत.