सेना दिवस परेडमध्ये पहिल्यांदाच जवानांचं नेतृत्त्व करणार 'या' महिला सैन्यदल अधिकारी

जाणून घ्या या अभिमानास्पद क्षणाविषयी 'त्या' अधिकारी नेमकं काय म्हणत आहेत. 

Updated: Jan 9, 2019, 12:42 PM IST
सेना दिवस परेडमध्ये पहिल्यांदाच जवानांचं नेतृत्त्व करणार 'या' महिला सैन्यदल अधिकारी   title=

मुंबई : कोणत्या ना कोणत्या मार्गाने देशाची सेवा करण्याची अनेकांचीच इच्छा असते. मुख्य म्हणजे काहींना देशसेवेची आणि आपलं वेगळेपण सिद्ध करण्याची संधीही मिळते. अशीच संधी सध्या भारतीय सैन्यदलातील महिला अधिकारी भावना कस्तुरी आणि कॅप्टन शिखा यांना मिळाली आहे. सध्या सैन्यदलाच्या वर्तुळात त्यांच्याच नावाची चर्चा होत आहे. या चर्चा रंगण्यामागचं कारणही तसंच आहे. 

'द पायोनिर'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार १५ जानेवारी या सेना दिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या संचलनाचं नेतृत्त्व महिला अधिकारी करणार आहेत.  भारतीय सैन्यातील भूदलाच्या इतिहासात सेना जवानांच्या तुकडीचं नेतृत्त्वं करणाऱ्या त्या पहिल्याच महिला ठरत आहेत. 

भावना कस्तुरी असं त्यांचं नाव असून, सैन्यदलातील logistic support function या तुकडीचं त्या नेतृत्व करणार आहेत. ज्यामध्ये जवळपास, २३ वर्षांतर १४४ जवानांचा सहभाग असणार आहे. 


छाया सौजन्य- नवभारत टाईम्स

'द पायोनिर'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आपल्या कारकिर्दीत मिळालेल्या या संधीविषयी अधिक माहिती देत लेफ्टनंट कस्तुरी म्हणाल्या, 'सेना दिवस परेडमध्ये एका महिला अधिकाऱ्याने नेतृत्त्व करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी कोणत्याच महिला अधिकाऱ्याने जवानांच्या तुकडीचं नेतृत्वं केलं नव्हतं.'


छाया सौजन्य- एएनआय 

आपल्याला मिळालेल्या या संधीबद्दल त्यांनी सैन्यदलाचे आभार मानले असून, संपूर्ण व्यवस्थेतच झालेला हा सकारात्मक बदल स्वागतार्ह असल्याचं मतही मांडलं. लेफ्टनंट कस्तुरी यांच्याव्यतिरिक्त कॅप्टन शिखा यासुद्धा सेना दिवसाच्या परेडमध्ये त्यांच्यासोबत महत्त्वाची भूमिका निभावताना दिसणार आहेत. ३३ मोटारसायकलस्वार जवानांच्या तुकडीचं त्या नेतृत्वं करणार आहेत. सेना दिवसाच्या निमित्ताने होणाऱ्या या संचलनाव्यतिरिक्त २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीही लेफ्टनंट कस्तुरी आणि कॅप्टन शिखा यांच्या नेतृत्वाखाली जवानांच्या तुकड्या संचलनात सहभागी होणार आहेत.