बायकोसमोर मूल न होण्यावरुन चिडवलं; 'तो' घरात हातोडा घेऊन घुसला आणि पाडला रक्ताचा सडा, नंतर सिलेंडरचं झाकण...

Crime News: पंजाबमध्ये (Punjab) एका 46 वर्षीय व्यक्तीने शेजाऱ्यांची हातोड्याने वार करत निर्घृण हत्या (Murder) केली आहे. शेजारी सतत मूलं जन्माला घालण्यास सांगत असल्याने आरोपीने संतापाच्या भरात हे कृत्य केलं.   

शिवराज यादव | Updated: Jul 9, 2023, 03:00 PM IST
बायकोसमोर मूल न होण्यावरुन चिडवलं; 'तो' घरात हातोडा घेऊन घुसला आणि पाडला रक्ताचा सडा, नंतर सिलेंडरचं झाकण... title=

Crime News: शेजारी सतत मुलं जन्माला का घालत नाही अशी विचारणा करत असल्याने चिडलेल्या व्यक्तीने त्यांची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंजाबच्या (Punjab) लुधियानामधील (Ludhiana) सालेम ताबरी येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी 46 वर्षीय आरोपीला अटक केली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारी सतत मुलं जन्माला घालण्याची विचारणा करत असल्याने आरोपीने हे कृत्य केलं. रॉबिन उर्फ अण्णा असं आरोपीचं नाव आहे. गुरुवारी ही घटना घडली.

पोलीस आयुक्त मनदीप सिंह सिंधू यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, पीडितांमध्ये एक महिला, तिचा पती आणि तिची सासू आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. 

मुन्ना ई-रिक्षाचा चालक आहे. सुरिंदर कौर त्याला नेहमी मूल जन्माला घालण्यावरुन चिडवत असे. तसंच तू उपचार करुन घे असा सल्ला देत असे. सुरिंदर कौर त्याच्या पत्नीसमोर हा मुद्दा उपस्थित करत असे, त्यामुळे मुन्नाला अपमानजक वाटत होतं अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

गुरुवारी सकाळी मुन्नाची यावरुन भांडणं झाली. याच भांडणातून त्याने 70 वर्षीय सुरिंदर कौर, तिचा पती 75 वर्षीय चमन लाल आणि त्याची 90 वर्षीय सासूवर हातोड्याने हल्ला केला आणि ठार केलं. 

पोलिसांनी मुन्नाला अटक केली आहे. दरम्यान, अटकेनंतर त्याने कोणत्याही प्रकारे पश्चाताप व्यक्त केलेला नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, त्याने आपल्यानंतर पत्नीची काळजी घेण्यासाठी कोणीही नाही असं सांगत तिलाही अटक करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, मुन्नाने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. 

हत्या केल्यानंतर मुन्नाने हा अपघात असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला. मुन्नाने स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा व्हॉल्व्ह उघडला आणि उदबत्ती पेटवली जेणेकरुन खोलीला आग लागेल आणि सर्व पुरावे नष्ट होतील.

पोलिसांनी एका पीडित व्यक्तीची बॅग जप्त केली. ज्यामध्ये कॅमेरा आणि मोबाइल फोन सापडला. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला हातोडाही जप्त केला आहे. पोलिसांनी हातोड्याची तपासणी केली असता त्यावर रक्ताचे डाग आढळले. 

सकाळी दूधवाला आला असता ही घटना उघडकीस आली. दूधवाल्याने दरवाजा ठोठावल्यानंतरही आतून कोणीही उत्तर देत नसल्याने त्याने शेजाऱ्यांना सांगितलं. गुरुवारीही घराचा दरवाजा कोणीच उघडलेला नव्हता. यानंतर शेजारी मागील भिंतीवरुन घरात शिरले. आत गेले असता घऱातील तिघांचे मृतदेह पडलेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुार, सुरिंदर कौर यांची चारही मुलं परदेशात आहेत.