'अरे हा काय प्रकार आहे', अपघातानंतर तुटलेला हात उचलून तरुण रुग्णालयात पोहोचला, हसताना पाहून डॉक्टरही चक्रावले

सुमन कुमार याचा ट्रेनमधून पडून अपघात झाला होता. यानंतर त्याने कापला गेलेला आपला हात उचलला आणि रुग्णालयाच्या शोधात निघाला. पण हे चित्र पाहिल्यानंतर रस्त्यावर चालणाऱ्या लोकांना मात्र धक्का बसला.  

शिवराज यादव | Updated: Sep 7, 2023, 12:05 PM IST
'अरे हा काय प्रकार आहे', अपघातानंतर तुटलेला हात उचलून तरुण रुग्णालयात पोहोचला, हसताना पाहून डॉक्टरही चक्रावले title=

बिहारमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती चक्क आपला तुटलेला हात हातात घेऊन रस्त्यावरुन चालताना दिसत आहे. तरुण रस्त्यावरुन चालत निघालेला असताना, हे चित्र पाहून लोकांना धक्का बसला. यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली असता, ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्याला रुग्णालयात दाखल केलं. तरुण आपलाच तुटलेला दुसरा हात घेऊन पोहोचल्याचं पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला होता. 

बिहारच्या भागलपूर येथे ही घटना घडली आहे. सुलतानगंज पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील या घटनेत अपघातानंतर तरुण आपला तुटलेला हात उचलून रस्त्यावर चालत होता. आपला हात पुन्हा जोडला जावा यासाठी तो रुग्णालयाचा शोध घेत होता. विशेष म्हणजे जेव्हा तो रस्त्यावर चालत होता तेव्हा चेहऱ्यावर हास्य होतं. हे पाहिल्यानंतर पादचारी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते. 

आईची बाईकवरील 'ती' एक चूक अन् खांद्यापासून वेगळा झाला 4 वर्षांच्या मुलीचा हात; तुम्ही ही चूक करत नाही ना?

 

तरुणाला रक्तबंबाळ अवस्थेत आपलाच हात घेऊन चालताना पाहून काही लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता, त्यांनी त्याला जवाहरलाल नेहरु कॉलेज रुग्णालयात दाखल केलं. 

सुमन कुमार असं या तरुणाचं नाव असून पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने सगळा घटनाक्रम उघड केला. सुमन कुमार याने पोलिसांना सांगितलं की, ट्रेनमधून प्रवास करत असताना मी खाली पडलो. यावेळी माझा हात कापला गेला. यानंतर हात पुन्हा जोडला जावा यासाठी मी रुग्णालय शोधत होतो. 

"जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुमन कुमार असं या तरुणाचं नाव असून, तो धावत्या ट्रेनमधून खाली पडला होता. त्याच्यावर उपचार सुरु असून, त्याच्या नातेवाईकांना कळवण्यात आलं आहे," अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आईची बाईकवरील 'ती' एक चूक अन् खांद्यापासून वेगळा झाला 4 वर्षांच्या मुलीचा हात

राकेश सोलंकी आपली पत्नी सलिता आणि मुलगी अंशिका उर्फ डोलू यांच्यासह भगवानपुरा येथून खरगोनला निघाले होते. सलिता सोलंकी मागील सीटवर बसल्या होत्या. ऊन लागत असल्याने त्यांनी मुलीला स्कार्फने झाकलं होतं. याचवेळी रस्त्यात अचानक स्कार्फ मागच्या चाकात जाऊन अडकला. यादरम्यान काही कळण्याच्या आधीच मुलीचा हातही मागच्या चाकात जाऊन अडकतो आणि खांद्यापासून वेगळा झाला. 

राकेश सोलंकी यांनी बाईक थांबवली तेव्हा मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. दरम्यान, अपघात झाल्याने लोकांचीही गर्दी झाली होती. यातील एका व्यक्तीने दुचाकीत अडकलेला मुलीचा हात बाहेर काढला. यावेळी उपस्थितांनाही अपघात पाहून धक्का बसला होता. राकेश सोलंकी आणि सलिता यांना तर काही सुचतच नव्हतं. दरम्यान, उपस्थितांनी एक रिक्षा थांबवत त्यांना रुग्णालयात पाठवलं. यावेळी तुटलेला हात पिशवीतून नेण्यात आला.