बलात्काराच्या जखमा विसरत मुलीने दिला बाळाला जन्म, आई होताच पुन्हा एकदा गँगरेप

Crime News: तांत्रिकाने बलात्कार केल्यानंतर अल्पवयीन पीडित मुलीने बाळाला जन्म दिला होता. धक्कादायक बाब म्हणजे मुलगी रुग्णालयात असतानाच तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी तांत्रिक आणि रुग्णालयातील पार्किंग परिसरात काम करणाऱ्या दोघांना अटक केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 11, 2023, 03:26 PM IST
बलात्काराच्या जखमा विसरत मुलीने दिला बाळाला जन्म, आई होताच पुन्हा एकदा गँगरेप

Crime News: राजस्थानमध्ये (Rajasthan) बलात्कार पीडितेवरच पुन्हा एकदा सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सौलंबर जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. पीडित मुलगी 10 वीत शिकत असून, तिच्यावर एका तांत्रिकाने बलात्कार केला होता. यानंतर पीडित मुलीने रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला. धक्कादायक बाब म्हणजे, मुलगी रुग्णालयात दाखल असतानाच तिच्यावर तेथील कर्मचाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी याप्रकरणी तांत्रिक आणि रुग्णालयाच्या पार्किग परिसरातील दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. 

तांत्रिक हा साळुंबर पाटबंधारे विभागात शासकीय कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. अल्पवयीन मुलगी आजारी पडल्यानंतर तिच्यावर उपचार करण्याच्या बहाण्याने त्याने बलात्कार केला होता. मुलीने 6 जूनला रुग्णालयात बाळाला जन्म दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं होतं. बाळाची आई अल्पवयीन असल्याचं लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना संपर्क साधत घटनेची माहिती दिली. 

पोलिसांना रुग्णालय गाठत पीडित मुलीचा जबाब नोंदवून घेतला. पण याप्रकरणी मुलीने कोणतीही तक्रार दाखल केली नाही. पण एका महिन्यानंतर 6 जुलैला मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन गाठलं. रुग्णालय परिसरात मुलीवर बलात्कार झाल्याचा आरोप कुटुंबाने केला. यानंतर पोलिसांनी तांत्रिक आणि रुग्णालयाच्या पार्किंग परिसरात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी अल्पवयीन मुलीलाही ताब्यात घेतलं आहे. 

"सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या बाळाचा डीएनए वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे," अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रदीप यांनी दिली आहे. ही रिपोर्ट एका महिन्याने मिळणार आहे. रिपोर्ट मिळाल्यानंतरच बाळाचा खरा बाप कोण आहे याचा उलगडा होईल असंही त्यांनी सांगितलं आहे. 

दरम्यान, पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितलं आहे की, ते पंचायत समितीच्या शेजारी राहत होते. तिथेच त्यांची तांत्रिक लक्ष्मणशी ओळख झाली होती. करोना काळात मुलीचे वडील रुग्णालयात काम करु लागले होते. याचवेळी त्यांची मुलगी आजारी पडली होती. यादरम्यान तांत्रिकाने त्यांना मुलीला माझ्याकडे घेऊन या, मी तिला बरं करतो असं सांगितलं होतं. यानंतर तांत्रिकाने उपचाराच्या बहाण्याने वारंवार मुलीवर बलात्कार केला.