कोझिकोड : केरळमधील कोझिकोड जिल्ह्यात पसरलेल्या घातक आणि तितक्याच दूर्मिळ निपाह व्हायरसमुळे आतापर्यंत १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. यात पोरांबरा तालुका रूग्णालयात कर्तव्य बजावत असलेल्या लिनी (वय ३१) नावाच्या एका नर्सचाही समावेश आहे. दरम्यान, लिनीने मृत्यूपूर्वी मोठा त्याग केला आहे. ज्याची प्रसारमाध्यमांतून चर्चा होत आहे. आपल्याला निपाह व्हायरसची लागण झाल्याचे समजताच लिनीने स्वत:ला कुटुंबियांपासून दूर ठेवले होते. जेणेकरून कुटुंबियांना या व्हायरसची लागण होऊ नये.
दरम्यान, मूळच्या चेंबानोडा परिसरात राहणाऱ्या लिनीच्या परिवाराने तिचा मृतदेह स्विकारण्याऐवजी आरोग्य विभागातील विद्यूतदाहीनीत तिला अग्नी देण्यास सांगितले होते. लिनी निपाह व्हायरसग्रस्त होती. निपाह व्हायरसची लागण झालेल्या रूग्णांवर उपचार करताना लिनीला निपाह व्हायरसची लागण झाली.
लिनीचे मामा व्ही बालन यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'आपल्या अखेरच्या दिवसात लिनीला आपण निपाह व्हायरसची शिकार झाल्याचे समजले. तिने चंगारोठ येथील एका युवकावर सुरूवातीच्या काळात उपचार केले होते. त्या वेळी निपाह व्हायरसबाबत इतकी माहिती आणि त्याची तीव्रताही नव्हती. नेमका या युवकाला निपाह व्हायरसची लागण झाली होती. अलपावधीत या युवकाचा मृत्यू झाला. लिनी नेहमी दुसऱ्यांच्या मदतीसाठी जगत होती. तिला मृत्यूही रूग्णावर उपचार करतान आला. रूग्णावर उपचार करताना तिने आपल्या जीवाची पर्वा केली नाही. तिने आपल्या जीवनाचा रूग्णसेवेसाठी त्याग केला.'
लिनीला सिद्धार्थ (५) आणि रितुल (२) अशी दोन मुले आहेत. या दोन्ही मुलांना आपल्या आईला शेवटचे पाहण्याचे भाग्यही मिळाले नाही. लिनीचे पती आखाती देशात नोकरी करतात. लिनीच्या आजाराबाबत समजल्यावर दोनच दिवसांपूर्वी ते परत आले होते.
दरम्यान, पर्यटन मंत्री कदाकमपल्ली सुरेंद्रन यांनी लिनीच्या निधनावर तीव्र दुख व्यक्त करत फेसबुकवर एक पोस्ट लिहीली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिनीचे शेवटचे पत्रही शेअर केले आहे. लिनीने आपल्या पतीला लिहीले होते. 'मला वाटत नाही की, मी आता तुम्हाला भेटू शकेन. कृपया मुलांची काळजी घ्या. त्यांना तुमच्यासोबत आखाती देशांत घेऊन जा. आणि हो...., माझ्या वडिलांसारखे एकटे राहू नका.' लिनी कोझिकोड येथील एका खासगी रूग्णालयात काम करत होती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ती काँट्रेक्ट तत्वावर तालुका रूग्णालयात रूजू झाली होती. ज्या युवकावर तिने उपचार केला, त्याचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून लिनीला प्रचंड दु:ख झाले होते, असे तिचे शेजारी सांगतात.