तुमचा Aadhar Card नंबर कोणाला-कोणाला दिलाय? या डॉक्टरांसारखी चूक तुम्ही तर केली नाहीए ना?

कळत नकळत आपण आपला आधारकार्ड अनोळखी व्यक्तीला देतो, आणि इथेच आपण मोठी चूक करतो  

Updated: Sep 11, 2022, 06:36 PM IST
तुमचा Aadhar Card नंबर कोणाला-कोणाला दिलाय? या डॉक्टरांसारखी चूक तुम्ही तर केली नाहीए ना? title=

Aadhar Card Update : भारतातल्या प्रत्येक नागरिकांसाठी आधार कार्ड एक महत्त्वाचं दस्ताऐवज आहे. सरकारी आणि खासगी ठिकाणी कामासाठी आधार कार्डची आवश्यकता असते. मुलांचे प्रवेश, बँक खाते उघडणे, प्रवास करताना, हॉटेल बुक करणे, मालमत्ता खरेदी करणे, बाजारात गुंतवणूक करणे इतकंच काय तर मोबाईलचं सिम घेण्यासाठी सुद्धा आधार कार्डचा वापर केला जातो. आधार कार्डवर नाव, फोटो, जन्मतारीख, पत्ता आदींची नोंद केली जाते. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून (UIDAI) 12 अंकी ओळख क्रमांक दिला जातो. 

पण काही वेळा आपल्याकडून मोठी चूक होऊ शकते. घाई गडबडीत किंवा एखादी वस्तू स्वस्तात मिळत असेल तर आपण आपला आधार कार्ड नंबर देऊ टाकतो. काही लोकांना वाटतं आधारकार्ड केवळ एक ओळखपत्र तर आहे, ते दिल्याने काय फरक पडतो. पण आपल्याला वाटतं तितकं हे सोप नाही. आधारकार्ड आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आधारकार्डद्वारे आपलं बँक खातं, पॅन नंबर, मोबाईल नंबर आणि वोटर आयडीची माहिती सहज मिळवता येऊ शकते. पटनामध्ये राहणाऱ्या डॉक्टरबरोबर जी घटना घडली ती प्रत्येकाच्या डोळ्यात अंजन टाकणारी आहे. 

मुंबई पोलीस असल्याचं सांगत फोन
पटना इथले स्कीन स्पेशालिस्ट डॉक्टर राहुल कुमार शर्मा यांच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरुन फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण मुंबईतून पोलीस ऑफिसर असल्याचं सांगितलं. त्या व्यक्तीचा फोन आला तेव्हा डॉक्टर राहुल शर्मा ओपीडी करत होते. त्याचवेळी त्यांना फोन आला. तुम्ही मुंबईहून तैवानला जे पार्सल पाठवलं होतं, त्यात अंमलीपदार्थ आणि बनावट पासपोर्ट सापडले असून कस्टम अधिकाऱ्यांनी ते जप्त केल्याचं फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं. याप्रकरणी एका व्यक्तिला अटक करण्यात आली असून तुमच्यावर मनी लॉण्ड्रींगची केस होऊ शकते असं डॉक्टरांना सांगण्यात आलं. 

डॉक्टर राहुल शर्मा यांनी या आरोपांचा इन्कार केला. आपण कोणतंही पार्सल पाठवलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. पण आपण मुंबई पोलीस अधिकारी असल्याचं सांगत त्याने डॉक्टर राहुल शर्मा यांच्याकडून त्यांचा आधारकार्ड नंबर घेतला. विशेष म्हणजे डॉक्टर राहुल शर्मा यांनीही आधारकार्ड नंबर दिला. यांनंतर तुमचं किती बँकेत अकाऊंट आहे याचीही त्या व्यक्तीने माहिती घेतली. 

व्हॉट्सअॅपवर पाठवलं खोटं आयकार्ड
हे प्रकरण खरं आहे असं भासवण्यासाठी समोरच्या व्यक्तीने डॉक्टर राहुल यांना व्हॉट्सअॅपवर आपल्या आयडीचा फोटो पाठवला. ज्यात त्या व्यक्तीचं नाव नरेश गुप्ता असं लिहिण्यात आलं होतं. त्यासोबतच सीबीआयची खोटी नोटीस आणि एक फोटही पाठवला. त्या फोटोत एक अटक केलेला व्यक्ती होता. डॉक्टर शर्मा पूर्णपणे गोंधळून गेले होते. पण आपल्याला फसवलं जात असल्याचं लक्षात येताच त्यांनी आधी आपली दोन्ही बँक अकाऊंट तपासले. तेव्हा आपल्या अकाऊंटमधून लाखो रुपये काढले गेल्याचं त्यांना समजलं.

पैसे काढले गेले, पण मेसेज आला नाही
सायबर गुन्हेगारांनी डॉक्टर राहुल शर्मा यांच्या अकाऊंटमधून लाखो रुपये वळते कोले होते. पण त्याचा एकही मेसेज त्यांच्या फोनवर आला नव्हता. सायबर गुन्हेगाराने ब्लँक सिमचा वापर केला होता. डॉक्टर राहुल शर्मा यांनी दिलेल्या आधारकार्डचा नंबर घेऊन तो सिम कार्डशी क्लोन करण्यात आला. त्यानंतर डॉक्टर राहुल शर्मा यांच्या अकाऊंटमधून पैसे काढण्यात आले. त्यामुळेच डॉक्टर राहुल शर्मा यांच्या मोबाईलवर पैसे काढल्याचा मेसेज आला नव्हता. ओटीपी थेट सायबर गुन्हेगाराने वापरलेल्या मोबाईल नंबरवर आला होता.