नवी दिल्ली : बॅंक खाते, मोबाईल नंबर, गॅस कनेक्शन आणि इतरही महत्वाच्या सुविधांना आधार लिंक करून घेतल्यानंतर आता सरकारने आणखी एक नवा नियम आणला आहे.
सरकारने आता पोस्टातील बचत खात्यांसाठी बायोमेट्रिक ओळख संख्या देणे अनिवार्य केली आहे. आता पोस्ट ऑफसमध्ये लोक भविष्य निधी(PPF), राष्ट्रीय बचत पत्र(NSC) आणि किसान विकास पत्र (KVP) साठी आपला आधार नंबर देणे आवश्यक आहे. खातेदारांना आता १२ अंकी आधार क्रमांक आपल्या पोस्ट खात्यातील अकाऊंटसोबत जोडण्यासाठी ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
अर्थ मंत्रालयाने चार वेगवेगळ्या अधिसूचना जारी करून सर्वच पोस्ट ऑफिस जमा खाते, पीपीईएफ, एनएससी आणि केवीपी खाते उघडण्यासाठी आधार अनिवार्य केले आहे. २९ सप्टेंबरला जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, जर एखाद्या व्यक्तीला आधार नंबर मिळाला नसेल तर त्यांनी त्यांच्या आधार नामांकनचं प्रमाण द्यावं.
दरम्यान, सरकार बचत खाते, मोबाईल फोन आणि इतरही अन्य सुविधांसाठी आधार नंबर अनिवार्य करण्यावर जोर देत आहे. काळापैसा रोखण्यासाठी सरकार हे करत असल्याचं बोललं जातं. गेल्या महिन्यात सरकारने सरकारी योजना आणि सब्सिडीचा लाभ घेणा-यांनाही आधार नंबर लिंक करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत वाढवून दिली आहे.