नवी दिल्ली : सध्या बँक अकाऊंट, मोबाईल नंबरशिवाय काही सरकारी सेवांमध्ये आधारकार्ड नंबर लिंक करणे गरजेचे झालेय. मात्र आता ऑनलाईन शॉपिंगसाठीही आधार लिंक करणे गरजेचे असणार आहे.
तुम्हाला या गोष्ट पटो वा न पटो. मात्र हे १०० टक्के खरं आहे. आता देशांत ऑनलाईन सर्व्हिस देणाऱ्या कंपन्या ग्राहकांना आधार लिंक करण्याचे आवाहन करत आहेत. अॅमेझॉनने ग्राहकांना १२ डिजीट यूआयडी नंबरचे डिटेल्स वेबसाईटवर अपलोड करण्यास सांगितले आहे.
अॅमेझॉनशिवाय कार रेंटल प्लॅटफॉम झूमकारनेही ओळखपत्र म्हणून आधारकार्ड मागितलेय. कंपनीने यूझर्सना आधारचे डिटेल्स वेबसाईटवर अपलोड करण्याचे आवाहन केलं आहे.
झूमकार आधार नंबरच्या आधारावरच उत्तर भारतातील काही शहरे आणि विजयवाडामध्ये कार बुकिंग करत आहे. कंपनीने जून महिन्यापासून आधार डिटेल्स जमा करण्यास सांगितले.
आधारकार्ड अनिवार्य करण्याबाबत अॅमेझॉनचे प्रवक्ते म्हणाले, ग्राहकांच्या ओळखीसाठी आयडी प्रूफची गरज असते. यामुळेच आम्ही यूझर्सना आधारनंबर अपलोड करण्यास सांगितले आहे. दरम्यान, सध्या तरी आधारचे डिटेल्स यूझर्सनी दिले नसले तरी डिलीव्हरी केली जात आहे.