बिहार निवडणूक: अभिनेते शत्रुघ्न सिन्हांचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात

अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुलाला काँग्रेसकडून उमेदवारी

Updated: Oct 14, 2020, 01:01 PM IST
बिहार निवडणूक: अभिनेते शत्रुघ्न सिन्हांचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात

पटना : बॉलिवूड अभिनेते आणि माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव्ह सिन्हा यांनी देखील राजकारणात प्रवेश केला आहे. या वेळी ते बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यासाठी काँग्रेसने त्यांना आपला उमेदवार जाहीर केला आहे. या वेळी ही जागा हाय प्रोफाइल बनली आहे. कारण, स्वत:ला सीएम फेस म्हणणाऱ्या पुष्पम प्रिया चौधरीही येथून रिंगणात आहेत. तर भाजपने येथून तीन वेळा आमदार नितीन नवीन यांना उमेदवारी दिली आहे, तर महिला आयोगाच्या सदस्या राहिलेल्या सुषमा साहू यांनीही या जागेवरुन निवडणूक लढवण्याचा विचार केला असल्याचे वृत्त आहे.

बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना दोन जुळे मुले आहेत. ज्यांचं नाव लव्ह आणि कुश सिन्हा असं आहे. तर मुलगी सोनाक्षी सिन्हा ही बॉलिवूड अभिनेत्री आहे.

लव सिन्हा हे देखील अॅक्टर आहेत. अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम देखील केलं आहे. तर त्यांचा भाऊ कुश हे डायरेक्टर आहेत. डायरेक्टर संजय लीला भंसाली यांच्या सांवरिया आणि अभिनव कश्यपच्या दबंग आणि बेशरम सिनेमांसाठी त्यांनी असिस्ट देखील केलं आहे.

2010 मध्ये सिनेकरिअरची सुरुवात लव सिन्हा यांनी केली होती. 2014 मध्ये त्यांनी वडील शत्रुघ्न सिन्हा यांचा जोरदार प्रचार देखील केला होता. आता त्यांच्या प्रचारासाठी बहिण सोनाक्षी सिन्हा आणि अनेक स्टार्स देखील येऊ शकतात.

आरजेडीसोबत काँग्रेसची आघाडी आहे. बांकीपूर विधानसभेची ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. पण त्यांच्यासमोर भाजपचे 3 वेळा आमदार असलेले नितीन नवीन यांचं तगडं आव्हान आहे. आतापर्यंत मोठ्या मताधिक्याने त्यांचा विजय झाला आहे.