Aditya-L1 ने पाठवला Selfie! पृथ्वी अन् चंद्राचा फोटोही पाठवला; 'या' फोटोत चंद्र शोधून दाखवा

Aditya L1 Selfie And Earth Moon Photo: भारतीय अंतराळ संस्था म्हणजेच इस्रोनं हा 41 सेकंदांचा व्हिडीओ शेअर केला असून त्यात 2 खास फोटो दाखवण्यात आलेले आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 7, 2023, 12:38 PM IST
Aditya-L1 ने पाठवला Selfie! पृथ्वी अन् चंद्राचा फोटोही पाठवला; 'या' फोटोत चंद्र शोधून दाखवा title=
आदित्य -L1 हे यान पृथ्वी आणि सूर्यादरम्यान असलेल्या L1 पॉइण्टला जाऊन स्थिरावणार

Aditya L1 Selfie And Earth Moon Photo: सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या पहिल्या सौर मोहिमेमधील आदित्य -L1 यानाने आपला सेल्फी पाठवला आहे. भारतीय अंतराळ संस्था म्हणजेच इस्रोनं गुरुवारी आपल्या 'एक्स' म्हणजेच ट्वीटर अकाऊंटवरुन एक छोटा व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी मंगळवारी इस्रोनं दिलेल्या माहितीमध्ये आदित्य -L1 यानाने अर्थ मॅन्यूअर पूर्ण करुन दुसरा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. आदित्य आदित्य -L1 ला 2 सप्टेंबर रोजी लॉन्च करण्यात आलं आहे.

स्वत:चा सेल्फी पाठवला

आदित्य -L1 ने सूर्य आणि पृथ्वीदरम्यानच्या L1 पॉइण्टकडे जाताना घेतलेला सेल्फी आणि त्यानंतर पृथ्वी व चंद्राचाही फोटो शेअर केला आहे. इस्रोनं 41 सेकंदांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या फोटोला त्यांनी ऑनलूकर म्हणजेच कुठे तरी जाता जाता पाहणारी व्यक्ती अशा अर्थाची कॅप्शन दिली आहे. आदित्य -L1 वरील व्हीईएलसी आणि एसयूआयटी यंत्रणा या फोटोमध्ये दिसत आहेत. आदित्य -L1 वरील कॅमेराने 4 सप्टेंबर 2023 रोजी टीपलेले हे फोटो आहेत. अशा कॅप्शनंतर आदित्य -L1 चा काही भाग दिसत असलेला फोटो या व्हिडीओत दिसतो. आदित्य -L1 वरील व्हीईएलसी आणि एसयूआयटी कुठे आहेत हे ही या फोटवर दर्शवण्यात आलं आहे. 

तुम्हाला दिसतोय का चंद्र?

आदित्य -L1 वरील कॅमेराने 4 सप्टेंबर 2023 रोजी पृथ्वी आणि चंद्राचा फोटो काढला आहे असं पुढे लिहिण्यात आलं असून त्यानंतर पृथ्वीचा फोटो व्हिडीओत दाखवण्यात आला आहे. हा फोटो पाहिल्यावर तुम्हालाही चंद्र कुठे आहे असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. पण काही सेकंदांनंतर पृथ्वीच्या उजव्या बाजूला असणारा एक छोटा बिंदू म्हणजे चंद्र असल्याचं व्हिडीओत म्हटलं आहे. तुम्हालाही हा फोटो पाहून लगेच कळणार नाही नेमका चंद्र आहे कुठे.

आदित्य -L1 करणार सूर्याचा अभ्यास

आदित्य -L1 हे यान पृथ्वी आणि सूर्यादरम्यान असलेल्या L1 पॉइण्टला जाऊन स्थिरावणार आहे. सूर्य आणि पृथ्वीमधील हा असा पॉइण्ट आहे जिथे पृथ्वी आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम एकमेकांच्या गुरुत्वाकर्षणामुळे रद्द होतो. त्यामुळेच या ठिकाणावर राहूनच आदित्य -L1 यान सूर्याचा अभ्यास करणार आहे. सूर्याच्या बाहेरील 3 आवरणांचा अभ्यास आदित्य -L1 कडून केला जाणार आहे.