शपथविधीचे निमंत्रण घेऊन आदित्य ठाकरे मनमोहन सिंग यांच्या भेटीला

 शिवसेना आमदार आदित्य ठाकरे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भेटीला गेले.

Updated: Nov 27, 2019, 11:21 PM IST
शपथविधीचे निमंत्रण घेऊन आदित्य ठाकरे मनमोहन सिंग यांच्या भेटीला  title=

नवी दिल्ली : उद्या शिवतिर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. महाविकास आघाडीचा भव्य शपथविधी सोहळा उद्या पार पडणार आहे. यासाठी कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी सोहळ्याला साजेसा असा सेट बनवण्याची जबाबदारी घेतली आहे. ठाकरे परिवारात सध्या निमंत्रण देण्याची धावपळ सुरु आहे. देशातील सर्व प्रमुख नेत्यांना या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी नुकतीच सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर ते माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भेटीला गेले. त्यांनी मनमोहन सिंग यांना शपशविधीचे निमंत्रण दिले आहे.  

राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसमधील नातेसंबंधात कमालीचा गोडवा आला आहे. त्यामुळेच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचे विशेष निमंत्रण देण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी दिल्ली गाठलंय. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत सोनियांना प्रत्यक्ष भेटून गुरुवारी होणाऱ्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलंय.

गुरुवारी उद्धव ठाकरे मुंबईतल्या शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीला सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची उपस्थिती निश्चित मानली जात होती. मात्र, शिवसेनेने काँग्रेससोबतचे संबंध आणखी दृढ करण्यासाठी आदित्य ठाकरे यांना दिल्ली गाठली आहे.