Reliance जिओची चांदी; फेसबुक, सिल्व्हर लेकनंतर आणखी एका कंपनीची मोठी गुंतवणूक

रिलायन्स जिओमधील परदेशी कंपन्यांची मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक महत्त्वाची मानली जात आहे. 

Updated: May 8, 2020, 09:00 AM IST
Reliance जिओची चांदी; फेसबुक, सिल्व्हर लेकनंतर आणखी एका कंपनीची मोठी गुंतवणूक title=

मुंबई: सध्या लॉकडाऊनमुळे भारतातील उद्योगांचे तीनतेरा वाजले असतानाच Reliance Jio कंपनीचे नशीब मात्र फळफळले आहे. कारण गेल्या काही दिवसांत फेसबुक आणि सिल्व्हर लेक अशा नामवंत कंपन्यांपाठोपाठ आणखी एका अमेरिकी कंपनीने Reliance Jio मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. विस्टा इक्विटी पार्टनर्सने तब्बल ११,३६७ कोटीची गुंतवणूक करून रिलायन्स जिओमधील २.३२ टक्के हिस्सा विकत घेतला आहे.

विस्टाच्या या गुंतवणुकीची इक्विटी व्हॅल्यू ४.९१ लाख कोटी असून एन्टरप्राईज व्हॅल्यू ५.१६ लाख कोटी इतकी असल्याची माहिती रिलायन्सकडून देण्यात आली आहे. विस्टा ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावाजलेली गुंतवणूक संस्था आहे. आमच्या इतर भागीदारांप्रमाणेच विस्टा भारतातील डिजिटल बाजारपेठेचा विकास करण्यासाठी उत्सुक असल्याचे रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले. 

यापूर्वी सिल्व्हर लेक या कंपनीने रिलायन्सच्या जिओ प्लॅटफॉर्ममध्ये ५६५५.७५ कोटीची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. तत्पूर्वी फेसबुकने तब्बल ४३ हजार कोटीची गुंतवणूक करत रिलायन्स जिओमधील ९.९ टक्के हिस्सा विकत घेतला होता.

सध्या लॉकडाऊनमुळे अनेक भारतीय कंपन्यांच्या व्यवसायाचे गणित बिघडले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा विपरीत परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर रिलायन्स जिओमधील परदेशी कंपन्यांची मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक महत्त्वाची मानली जात आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच दिल्लीत झालेल्या एका बैठकीत मंत्री आणि अधिकाऱ्यांना देशात जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक आणण्याचा सल्ला दिला होता. यासाठी उद्योगांना परवाने आणि इतर गोष्टींसाठी जातीने मदत करा, असे आदेशही त्यांनी मंत्र्यांना दिले आहेत.