नवी दिल्ली : आग्रा येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं जोरदार स्वागत होणार आहेच. पण आग्र्याच्या महापौरांकडून ट्रम्प यांना शहराची खास किल्ली भेट म्हणून दिली जाणार आहे. आग्र्याचे महापौर नवीन जैन यांनी ही खास चांदीची चावी बनवून घेतली आहे. ही किल्ली 12 इंच लांब असून 600 ग्रॅम वजनाची आहे. विशेष म्हणजे या किल्लीवर ताजमहलचं चित्र कोरण्यात आलं आहे.
कोणत्याही देशाचे राष्ट्राध्यक्ष इथं आल्यानंतर इथल्या शहराची किल्ली त्यांना देण्याची आग्र्यात प्रथा आहे. त्यानुसार आग्र्याचे महापौर नवीन जैन हे ट्रम्प यांना ही 600 ग्रॅमची चांदीची चावी भेट देणार आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी आग्रामध्ये मोठ्या प्रमाणात कलाकार जमायला सुरुवात झाली आहे. देशभरातून जवळपास ३ हजार लोक कलावंत आग्र्याला पोहोचले आहेत. भारतीय संस्कृतीचं दर्शन हे लोक कलावंत घडवणार आहेत. या कलाकारांना पाहण्यासाठी आग्र्याच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केलीय. ट्रम्प यांच्यासमोर भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवण्यासाठी सारेच उत्सुक आहेत.
उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. ट्रम्प आपल्या कुटुंबासोबत ताज महाल पाहाण्यासाठी येणार आहेत. यानिमित्त आग्र्यात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून, कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे श्री कृष्णाच्या पवित्र जन्मभूमीत ट्रम्प यांचं स्वागत अशा आशयाचे मोठमोठे पोस्टर्स आग्रामध्ये जागोजागी लावण्यात आले आहेत.