नवी दिल्ली: आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी दिल्लीत देशातील प्रमुख अर्थतज्ज्ञांची भेट घेणार आहेत. नीती आयोगाच्या कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या सद्य आर्थिक परिस्थितीसंदर्भात अर्थतज्ज्ञांशी संवाद साधतील. यावेळी अर्थतज्ज्ञांकडून देशाची अर्थव्यवस्था आणि रोजगाराची स्थिती सुधारण्यासाठी सरकारला उपाय सुचावले जाऊ शकतात. या सगळ्याचा विचार अर्थसंकल्प तयार करताना होऊ शकतो.
दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रमुख उद्योगपतींशी चर्चा केली होती. यामध्ये रतन टाटा, मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासह देशातील ११ प्रमुख उद्योगपती उपस्थित होते. या बैठकीत विकासदर आणि रोजगाराला चालना देण्याविषयी चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केवळ सरकारची स्तुती करू नका, अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी सल्ले द्या, अशी सूचना उपस्थितांना केली. या बैठकीला देशातील बड्या कंपन्यांचे प्रमुख उपस्थित असल्याने त्यांच्या सूचनांचा गांभीर्याने विचार केला जाऊ शकतो.
गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर ४.५ टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. ही गेल्या सहा वर्षांतील निच्चांकी कामगिरी आहे. याशिवाय, अन्य क्षेत्रांमध्येही मरगळ आली आहे. विशेषत: वाहननिर्मिती क्षेत्राला या मंदीचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे वाहननिर्मिती क्षेत्रातील हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. मध्यंतरी केंद्र सरकारने कंपनी कर आणि परकीय गुंतवणुकीवरील निर्बंध शिथील करण्यासारख्या काही उपाययोजना करून पाहिल्या होत्या. मात्र, त्याचा विशेष फायदा झाला नव्हता.
केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने मंगळवारी वर्तविलेल्या पहिल्या अग्रिम अंदाजानुसार, भारतीय अर्थव्यवस्था चालू संपूर्ण आर्थिक वर्षांतही सावरण्याची चिन्हे नाहीत. २०१९-२० मध्ये सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर ५ टक्केच राहण्याचा अंदाज खुद्द सरकारकडून वर्तविला गेला आहे.