चेन्नई : तामिळनाडूमधल्या सत्ताधारी AIADMK पक्षातल्या दोन गटांचं आज अखेर विलिनीकरण झालं. मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी बंडखोर गटाचे नेते ओ. पनीरसेल्वम यांना मंत्रिमंडळात घेतलं असून ते उपमुख्यमंत्री असतील.
पनीरसेल्वम यांचे निकटवर्ती के. पंडियाराजन यांनाही कॅबिनेटमध्ये घेण्यात आलंय. तामिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पनीरसेल्वम आणि पंडियाराजन यांना मंत्रिपदाची थपथ दिली.
पनीरसेल्वम यांच्याकडे अर्थ, गृहनिर्माण, ग्रामीण गृहनिर्माण आदी खाती देण्यात आलीयेत. पंडियाराजन यांच्याकडे राज्याच्या सांस्कृतिक खात्याचा कारभार सोपवण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू होती.
अखेर आज त्याला मुहूर्त सापडल्यानंतर AIADMKचं सरकार आता स्थिर झालंय. आता जेलमध्ये असलेल्या पक्षाच्या महासचिव शशिकला आणि त्यांच्या समर्थकांना पक्षातून हाकललं जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.