नवी दिल्ली : भारत द्वेशामध्ये अंध झालेल्या पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांना एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आरसा दाखवला आहे. इम्रान खान यांनी एक कथित व्हिडीओ शेअर करत भारतावर टीका केली होती. या व्हिडीओमध्ये उत्तर प्रदेशात मुस्लिम समुदायावर पोलीस अन्याय करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. यावर ओवेसी यांनी आपली प्रतिक्रिया देत पाकिस्तान पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. तुम्ही हिंदुस्थानी मुस्लिमांची काळजी सोडा आणि आपला देश संभाळा असा टोला इम्रान खान यांना लगावला आहे.
आमची काळजी करु नका. आमचे संविधान हे आमच्यासाठी देव आहे. तुम्ही तुमच्या देशाची काळजी करा. शिखांवर जो हल्ला झाला त्याकडे लक्ष द्या. आम्ही हिंदुस्थानी असल्याचा आम्हाला गर्व आहे असे ओवेसी म्हणाले.
शुक्रवारी इम्रान खान यांनी भारतात नागरिकता संशोधन कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांचे तीन व्हिडीओ ट्विटरवर शेअर केले. भारतात पोलिसांची हिंसा असा हवाला त्यांनी दिला. 'मोदी सरकारच्या आदेशानुसार भारतीय पोलीस मुस्लिमांवर हल्ला करत आहे.' असे त्यावर लिहिले.
तो व्हिडीओ भारतातील नसून बांगलादेशचा असल्याचे स्पष्ट झाल्यावर इम्रान खान यांची पोलखोल झाली. उत्तर प्रदेश पोलिसांनी इम्रान खान यांचा पर्दाफाश केला. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशचा नसल्याचे ट्वीट त्यांनी केले. २०१३ साली ढाका येथील घटनेचा हा व्हिडीओ असल्याचेही यूपी पोलिसांनी स्पष्ट केले. या व्हिडीओत लोक बांगला भाषा बोलत असल्याचेही ऐकू येते.
व्हिडीओमध्ये ज्या पोलिसांना इम्रान खान यांनी यूपीचे म्हटले त्यांच्या वर्दीवर आरएबी लिहिले आहे. आरएबी (रॅपिड एक्शन बटालियन) बांग्लादेश पोलिसांची दहशतवाद विरोधी बटालियन आहे.