Gold Mine in India : चीनमध्ये पृथ्वीवरील सर्वात मोठी सोन्याची खाण सापडली आहे (World’s largest gold reserve). अशातच चर्चा रंगली आहे ती भारतातील सोन्याच्या खाणीची. भारतातील सर्वात मोठी सोन्याची खाण कोणत्या राज्यात आहे ते माहित आहे का? भारतातील 80 टक्के सोनं इथचं सापडतं. जाणून घेऊया हे राज्य कोणते?
भारतीयांना सोन्याचे प्रचंड आकर्षण आहे. अनेकजण हौस म्हणून सोनं खरेदी करतात. तर, अनेकजण सोन्यात गुंतवणूक करतात. यामुळे भारतात सोन्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भारत हा जगातील सर्वाधिक सोने वापरणाऱ्या देशांपैकी एक देश आहे. भारतात अनेक राज्यात सोन्याच्या खाणी आहेत. या खाणींद्वारे भारतात दरवर्षी 774 टन सोन्याच्या वापराच्या तुलनेत सुमारे 1.6 टन सोन्याचे उत्पादन केले जाते.
भारतातील सर्वात मोठी सोन्याची खाण कर्नाटकमध्ये आहे. कर्नाटक हे भारतातील सर्वात मोठे सोने उत्पादक राज्य आहे. देशातील जवळपास 80 टक्क्यांहून अधिक सोने हे कर्नाटकातील सोन्याच्या खाणींमधून येते. भारतात सोन्याचे सर्वाधिक उत्पादन कर्नाटक राज्यातच होते. कोलार एहुट्टी आणि उटी नावाच्या खाणीतून मोठ्या प्रमाणात सोने काढले जाते. कर्नाटकातील कोलार गोल्ड फील्ड ही देशातील सर्वात मोठी सोन्याची खाण आहे. ही सोन्याची खाण कोलारमध्ये आहे. यासोबतच धारवाड, हसन, रायचूर जिल्ह्यातील सोन्याच्या खाणीतूनही मोठ्या प्रमाणात सोने काढले जाते. भारतात कर्नाटकनंतर सर्वाधिक सोने आंध्रप्रदेशात काढले जाते.
उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे 2020 मध्ये सोन्याची मोठी खाण सापडली. सोन पहाडी, हर्डी, चुर्ली, परासी आणि बसरिया या पाच ठिकाणी पसरलेल्या या साठ्यामध्ये 700 टन सोन्याचा धातू असल्याचा अंदाज आहे. गोव्याच्या सीमेजवळ कर्नाटकातील गणजूर सोन्याची खाण देखील मोठी आहे. डेक्कन गोल्ड माईन्स या खाजगी कंपनीच्या मालकीची ही खाण आहे. तेलंगणाच्या सीमेजवळ आंध्र प्रदेशात जोन्नागिरी सोन्याची खाण आहे. झारखंड येथे चांदिल आणि हिराबुद्दिनी येथे तसेच आंध्र प्रदेशातही सोन्याच्या खाणी आहेत.