उशिरा आल्याने राज्यपालांना विमानात नो एन्ट्री!; राजभवनाने दिले कारवाईचे आदेश

Governor Thaawarchand Gehlot : कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना गुरुवारी बेंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानात बसण्याची परवानगी देण्यात आली नाही. हे वृत्त समोर येताच एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  

आकाश नेटके | Updated: Jul 29, 2023, 08:46 AM IST
उशिरा आल्याने राज्यपालांना विमानात नो एन्ट्री!; राजभवनाने दिले कारवाईचे आदेश title=
(फोटो सौजन्य - PTI)

Karnataka Governor : कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत (thaawarchand gehlot) यांना न घेता बंगळुरुच्या (bengaluru) केम्पेगौडा विमानतळावरून (KIA) एअरएशियाच्या विमानाने गुरुवारी उड्डाण केले. राज्यपाल विमानात वेळेवर पोहोचले होते, तरीही त्यांना विमानात बसू दिले नाही, असा आरोप राजभवनने केला आहे. राज्यपालांनी त्यांच्या प्रोटोकॉल अधिकाऱ्यांना एअरलाइनवर कारवाई करण्यास सांगितले आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना उशिरा पोहोचल्यामुळे विमानात चढू दिले नाही असे म्हटलं जातं आहे. हे प्रकरण समोर आल्याने विमान कंपनीने चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.

कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना गुरुवारी उशीर झाल्यामुळे एअर इंडियाच्या उपकंपनीने विमानात बसण्याची परवानगी दिली नाही. मात्र, शुक्रवारी विमान कंपनीने माफी मागितली. खरं तर, गेहलोत उशिरा पोहोचल्यामुळे एअरएशियाच्या कनेक्ट फ्लाइटमध्ये  त्यांना चढू दिले गेले नाही.

नेमकं काय घडलं?

कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत 27 जुलै बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर एशिया फ्लाइटने (I15972) हैदराबादला रवाना होणार होते. पण राज्यपालांचे हे विमान चुकले. एअर एशियाचे विमान चुकल्यानंतर थावरचंद गेहलोत दीड तासानंतर दुसऱ्या विमानाने हैदराबादला रवाना होऊ शकले. राज्यपालांनी1.10 वाजता राजभवन सोडले आणि 1.35 वाजता टर्मिनल-1 च्या व्हीआयपी लाउंजमध्ये पोहोचले होते. तोपर्यंत राज्यपालांचे सामान विमानात ठेवण्यात आले होते. त्यानंतर राज्यपाल दुपारी 2.06 वाजता विमानाच्या जिन्याजवळ पोहोचले. एअर एशिया (एआयएक्स कनेक्ट) कर्मचारी आरिफने मात्र, तुम्हाला पोहोचण्यास उशीर झाल्याचे सांगून राज्यपालांना विमानात बसवण्यास नकार दिला. मात्र, त्यानंतरही विमानाचे दरवाजे उघडेच होते.

त्यानंतर राज्यपालांचे सामान विमानातून उतरवण्यात आले. त्यात आणखी 10 मिनिटे वाया गेली. विमानात बसू न दिल्याने राज्यपालांचा अपमान करण्यात आला. यानंतर राज्यपाल व्हीआयपी लाउंजमध्ये परतले. या सगळ्या प्रकारानंतर राज्यपाल ९० मिनिटांनी दुसऱ्या विमानाने हैदराबादला पोहोचले.

या संदर्भात राज्यपाल कार्यालयाने प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याची तक्रार दाखल केली.राज्यपालांचे प्रोटोकॉल ऑफिसर एम. वेणुगोपाल यांनी विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये एआयएक्स कनेक्ट आणि या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांसारख्या व्हीव्हीआयपींना सेरेमोनियल लाउंजमध्ये विशेष प्रवेश असतो. राज्यपालांच्या बाबतीत, कोणत्याही प्रकारच्या प्रोटोकॉलची आवश्यकता नसते. राज्यपालांना नेट विमानात प्रवेश दिला जाऊ शकतो. विमानाचे उड्डाण होण्याच्या अर्धा तास आधी बोर्डिंग बंद होते. इतर प्रवासी चढल्यानंतर राज्यपालांच्या प्रोटोकॉल टीमला अलर्ट केले जाते. गव्हर्नर हे विमानात चढणारे शेवटचे प्रवासी असतात. उशीर झाला तरी राज्यपालांना कोणीही प्रश्न विचारु शकत नाही.