रेल्वेचा मोठा निर्णय, ३० जूनपर्यंतची सर्व तिकिटे रद्द

कोरोना संकटामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. आता रेल्वे सेवाही बंद आहे. 

Updated: May 14, 2020, 11:54 AM IST
रेल्वेचा मोठा निर्णय, ३० जूनपर्यंतची सर्व तिकिटे रद्द  title=
संग्रहित छाया

मुंबई : कोरोना संकटामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. तसेच अनेक ठिकाणी संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच व्यवहार बंद आहेत. रेल्वे सेवाही बंद आहे. दरम्यान, अडकलेल्या मजूर, कामगारांसाठी श्रमिक रेल्वे गाड्या सुरु ठेवण्यात आल्या आहेत. मालवाहतूकही सुरु आहे. मात्र, रेल्वेने प्रवासी वाहतूक अद्याप सुरु केलेली नाही. दरम्यान, पुन्हा एकदा रेल्वेने आरक्षित तिकिटे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी रेल्वेने आरक्षित तिकिटे रद्द केली होती. आता ३० जूनपर्यंतची सर्व प्रवासी तिकिटे रद्द केली आहेत. याचा परतावा देण्यात येईल, असे रेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे ३० जून २०२० पर्यंत रेल्वे धावणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

३० जून रोजी तसेच त्यापूर्वीच्या प्रवासासाठी नियमित प्रवासी गाड्यांसाठी सर्व तिकिटे रद्द केली गेली आहे.  श्रमिक, विशेष गाड्या सुरु ठेवण्यात येणार आहेत. भारतीय रेल्वेने आरक्षित सर्व तिकिटे रद्द केली आहेत. रेल्वे सर्व प्रवाशांना परतावा देईल, असा दावा करण्यात आला आहे. तथापि, प्रवासी कामगार, मजूर यांच्यासाठी श्रमिक स्पेशल आणि इतर विशेष गाड्या सुरु राहतील, असे संकेत देण्यात आले आहे.

दरम्यान, भारतीय रेल्वेच्या विशेष रेल्वे सेवांच्या अंतर्गत येताच नवीन बुकिंग सुरू होईल. रद्द झालेल्या सर्व तिकिटांना पूर्ण परतावा उपलब्ध असेल. जर आपण जूनमधील  नियोजित प्रवासासाठी तिकिट बुक केले असेल तर ते तिकीट रद्द होईल. परंतु जर आपण येत्या काही दिवसांत आपल्या मूळ राज्यात परत जाण्याचा विचार करीत असाल आणि  तिकिटे बुक करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते शक्य नाही. कारण बुकिंग अद्याप सुरु करण्यात आलेले नाही. 

३० जून पर्यंत लॉकडाउन ४.० चालू असेल ,असे संकेत मिळत आहे. दरम्यान, अद्याप तरी याबाबत काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, ३० जूनपर्यंतची तिकिटे रद्द करण्याच्या निर्णयामुळे रेल्वे सेवा रुळावर येण्याची चिन्हे नसल्याचे संकेत आहेत. सध्या फक्त विशेष गाड्या आणि श्रमिक स्पेशल चालतील.