Amazon layoffs to impact over 18000 employees: सध्या सुरु असलेल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर 'अॅमेझॉन'मधून (Amazon) 18 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकलं जाणार आहे. मागील काही कालावधीमधील ही सर्वात मोठी कर्मचारीकपात ठरणार आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नावाजलेली कंपनी अशी ओळख असलेल्या 'अॅमेझॉन'मध्ये कर्मचारीकपात सुरु करण्यात आली आहे. या वृत्ताला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ (Amazon CEO) अॅण्डी जेसी (Andy Jassy) यांनी दुजोरा दिला आहे. कर्मचारीकपात सुरु झाली असून याचा फटका 18 हजार लोकांना बसणार असल्याचं अॅण्डी जेसी यांनी म्हटलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कर्मचारीकपातीमध्ये भारतातील हजारो लोकांनाही रोजगार गमवावा लागणार आहे.
मागील काही दिवसांपासून समोर आलेल्या बातम्यांमधून या कर्मचारीकपातीबद्दलची (Amazon layoffs) शंका व्यक्त केली जात होती. या बातम्यानुसार भारतातील जवळजवळ एक हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना 'अॅमेझॉन' डच्चू देणार आहे. यामध्ये तांत्रिक, मानव संधाधन आणि अन्य विभागातील कर्मचारीकपात करण्यात येणार आहे. मागील आठवड्यामध्ये कंपनीचे सीईओ अॅण्डी जेसी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये 18 जानेवारीनंतर कंपनी या कर्मचारीकपातीमध्ये नोकरी गमावणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहे, असं म्हटलं होतं.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार भारतामधील 'अॅमेझॉन'च्या गुरुग्राम, बंगळुरु आणि अन्य शहरामधील कार्यालयांमधून कर्मचारीकपात सुरु झाली आहे. सर्वाधिक तोटा सहन करावा लागत असलेल्या विभागांमधून कर्मचारीकपातीला सुरुवात झाली आहे. कंपनीने कामावरुन काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये फ्रेशर्स आणि अनुभवी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार 'अॅमेझॉन'ने कामावरुन काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवून पाच महिन्यांचा अगाऊ वेतन (अॅडव्हान्स सॅलरी) देण्याची ऑफर ठेवली आहे. कर्मचाऱ्यांनी एका ठराविक कालमर्यादेमध्ये आपल्या वरिष्ठांबरोबर यासंदर्भात चर्चा करुन निर्णय घ्यावा असं सांगण्यात आलं आहे. 'अॅमेझॉन'मधील ही कर्मचारीकपात पुढील काही आठवडे सुरु राहणार असल्याचं समजतं.
सध्या सुरु असलेल्या आर्थिक मंदीच्या कालावधीमधील ही सर्वात मोठी कर्मचारीकपात आहे. एकाच वेळी 18 हजार कर्मचाऱ्यांना डच्चू देणारी 'अॅमेझॉन' ही पहिली मोठी कंपनी आहे. सप्टेंबरच्या शेवटपर्यंत या कंपनीमध्ये प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे 15 लाख कर्मचारी काम करत होते. म्हणजेच सध्याची कर्मचारीकपात ही एकूण कर्मचारी संख्येच्या एक टक्क्यांहून अधिक आहे. कंपनीचे जगभरामध्ये साडेतीन लाख कॉर्परेट कर्मचारी आहेत.
कॉर्परेट जगतामधील घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या लेऑफ डॉट एफव्हायआय या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये दीड लाख लोकांनी रोजगार गमावला. ही कर्मचारीकपात नवीन वर्षातही सुरु राहणार आहे.