नवी दिल्ली : भारतामध्ये लोकसभा निवडणुकीला काही महिनेच बाकी आहेत. या निवडणुकीवर साऱ्या जगाचे लक्ष लागून राहीले आहे. या निवडणुकीवर अमेरिकेचा एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. अमेरिकन सिनेटला सुपूर्द केलेल्या अहवालानुसार, भारतीय जनता पार्टीने हिंदू राष्ट्रवाद मुद्द्यावर जोर दिला तर भारतात धार्मिक हिंसा होण्याची शक्यता आहे. अमेरिकन गुप्तचर यंत्रणा जगभरात होणाऱ्या संभाव्य धोक्यांचे मोजमाप करत असते. हा रिपोर्ट अमेरिकन सीनेटच्या समिती समोर दाखल करण्यात आला. डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजंस डॅन कोट्सने हा अहवाल तयार केला आहे.
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारतीय जनता पार्टी हिंदू राष्ट्रवादी मुद्द्यांवर पुढे गेली तर भारतात होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत धार्मिक हिंसा होण्याची शक्यता आहे, असे या अहवालात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ सुरू होण्याआधी भाजपा शासित राज्यांमध्ये धार्मिक तणाव वाढला. काही हिंदूत्ववादी नेत्यांनी हा हिंदू राष्ट्रवादाचा संकेत मानून समर्थकांमध्ये उर्जा भरण्यासाठी छोट्यामोठ्या हिंसक कारवाईंची मदत घेतली' असे डॅन कोट्सने आपल्या अहवालात म्हटले आहे.
निवडणुकीआधी अशा प्रकारची हिंसा भारतामध्ये इस्लामिक दहशतवादी संघटनांना प्रोत्साहन देऊ शकते. तसेच निवडणुकीआधी भारत आणि पाकिस्तानचे संबंध देखील तणावपूर्ण होऊ शकतात अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे. भारत पाकिस्तान बॉर्डरवर लाइन ऑफ कंट्रोल, क्रॉस बॉर्डर टेररिझम निवडणुकी पर्यंत वाढू शकतो. यामुळे दोन्ही देशामध्ये तणावाचे वातावरण वाढेल असा धोक्याचा इशाराही या अहवालातून देण्यात आला आहे. एप्रिल- मे दरम्यान भारतामध्ये लोकसभा निवडणूका होण्याची शक्यता आहे.