अमित शहांच्या कामाचा झपाटा पाहून गृहमंत्रालयातील अधिकारी अवाक

गेल्या कित्येक वर्षांमध्ये आपण कोणत्याही गृहमंत्र्यांला इतका वेळ कार्यालयात काम करताना बघितलेले नाही.

Updated: Jun 17, 2019, 03:41 PM IST
अमित शहांच्या कामाचा झपाटा पाहून गृहमंत्रालयातील अधिकारी अवाक title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांनीही लोकसभा निवडणुकीच्या काळात पायाला अक्षरश: भिंगरी लावल्याप्राणे देश पिंजून काढला होता. या दोन्ही नेत्यांच्या या अथकपणे काम करण्याच्या क्षमतेचे कौतुकही अनेकांनी केले आहे. आतादेखील सरकार स्थापनेनंतर त्यांच्या या कामात खंड पडलेला नाही. 

अमित शहा यांनी तर गृहमंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यापासून येथील कामाच्या पद्धतीत आमुलाग्र बदल झाला आहे. अमित शहा सकाळी साधारण दहाच्या सुमारास नॉर्थ ब्लॉक येथील कार्यालयात पोहोचतात. यानंतर ते रात्री आठपर्यंत कार्यालयातच असतात. ते दुपारचे जेवणही कार्यालयातच मागवतात. त्यामुळे दोन राज्यमंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांनाही शहा घरी जाईपर्यंत कार्यालयातच थांबावे लागते. एवढेच नव्हे तर अमित शहा सुट्टीच्या दिवशीही अनेकदा कार्यालयात येतात. गेल्या कित्येक वर्षांमध्ये आपण कोणत्याही गृहमंत्र्यांला इतका वेळ कार्यालयात काम करताना बघितले नसल्याचे 'एनडीटीव्ही'च्या पत्रकार नीता शर्मा यांनी सांगितले.

राजनाथ सिंह गृहमंत्री असताना ते दुपारच्या जेवणासाठी घरी जात. यानंतर ते घरूनच काम पाहायचे. त्यामुळे दुपारच्या वेळेनंतर बहुतांश बैठका राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानीच होत असत. मात्र, अमित शहा हे प्रत्येक बैठक आपल्या कार्यालयातच घेतात. याशिवाय, भाजप आणि घटकपक्षांचे नेतेही अमित शहा यांना नॉर्थ ब्लॉक येथील कार्यालयामध्येच येऊन भेटतात. 

अमित शहा हे देशाचे ३० वे गृहमंत्री आहेत. गृहमंत्रालयाच्या अखत्यारित एकूण १९ विभाग येतात. या सगळ्यांवर शहांची करडी नजर आहे. शहा यांनी पदाभर स्वीकारल्यानंतर सर्व विभागांना प्रेझेंटेशन तयार करण्याचे आदेश दिले होते. मात्र, भाजप नेत्यांच्या मते अमित शहांच्या कामाची ही पद्धती नवीन नाही. भाजपचे अध्यक्ष असतानाही ते कोणत्याही क्षणी फोन करून संबंधित नेत्याला एखादी जबाबदारी देत असल्याचे या नेत्यांनी सांगितले.