सॅम पित्रोदांच्या वक्तव्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी- अमित शहा

दहशतवादी हल्ल्याला एअर स्ट्राईकने उत्तर द्यायला नको होते, ही काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आहे का?

Updated: Mar 23, 2019, 03:21 PM IST
सॅम पित्रोदांच्या वक्तव्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी- अमित शहा title=

नवी दिल्ली: गांधी घराण्याचे निष्ठावंत सॅम पित्रोदा यांनी भारतीय वायूदलाच्या एअर स्ट्राईकविषयी शंका उपस्थित करून भारतीय लष्कराचा आणि जनतेचा अपमान केला आहे. याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केली. ते शनिवारी दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना काही सवाल विचारले. ज्या घटनेने देश मुळापासून हादरतो, ती घटना तुम्हाला सामान्य वाटते का? सात-आठ दहशतवाद्यांमुळे संपूर्ण देशाला दोषी ठरवता येत नाही, असे पित्रोदा म्हणतात. परंतु, त्यांचा पाकिस्तानशी संबंध असेल तर याबाबत काँग्रेसची भूमिका काय आहे? दहशतवादी हल्ल्याला एअर स्ट्राईकने उत्तर द्यायला नको होते, ही काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आहे का, हे राहुल गांधी यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी शहा यांनी केली. 

काँग्रेस पक्ष निवडणुका जवळ आल्यानंतर लांगुलचालनाचे राजकारण सुरु करतो. आम्हाला त्याच्याशी देणेघेणे नाही. मात्र, व्होटबँकेचे राजकारण हे देश आणि शहीद सैनिकांपेक्षा मोठे आहे का? काँग्रेस पक्षाकडून एअर स्ट्राईकचे पुरावे मागितले जातात. इतर कोणालाही त्याची गरज वाटत नाही. काँग्रेस या माध्यमातून कोणाला खुश करू पाहत आहे? व्होटबँकेचे हे राजकारण जनतेच्या लक्षात आल्यानंतर काँग्रेसने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. या सवयीमुळेच जनतेने काँग्रेसला खड्यासारखे बाजूला केले, अशी टीका शहा यांनी केली. 

सॅम पित्रोदा यांनी 'एएनआय' वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत भारतीय वायूदलाने बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. एअर स्ट्राईकमध्ये खरंच ३०० दहशतवादी ठार झाले असतील तर सरकारने पुरावे सादर करावेत, अशी मागणीही त्यांनी केली होती.