अमित शहांना मिळणार अटलबिहारी वाजपेयींचा बंगला

अटलबिहारी वाजपेयी तब्बल १४ वर्षे या बंगल्यात वास्तव्याला होते.

Updated: Jun 7, 2019, 03:06 PM IST
अमित शहांना मिळणार अटलबिहारी वाजपेयींचा बंगला title=

नवी दिल्ली: देशाच्या केंद्रीय गृहमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर अमित शहा यांना दिल्लीत राहण्यासाठी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचा बंगला मिळण्याची शक्यता आहे. २००४ मध्ये पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी तब्बल १४ वर्षे या बंगल्यात वास्तव्याला होते. मात्र, गेल्यावर्षी अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी हा बंगला सोडला होता. 

यानंतर आता कृष्ण मेनन मार्गावरील हा बंगला अमित शहा यांनी मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या या बंगल्यात अमित शहा यांच्या गरजेनुसार बदल करण्याचे काम सुरु आहे. अमित शहा सध्या ११ अकबर रोड येथील बंगल्यात राहतात. 

अटलबिहारी वाजपेयी कृष्णा मेनन मार्गावरील बंगल्यात वास्तव्यास आले तेव्हा बंगल्याचा क्रमांक ८ बदलून ६-ए करण्यात आला होता. २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर नेत्यांचे वास्तव्य असणाऱ्या कोणत्याही सरकारी बंगल्याचे त्यांच्या मृत्यूनंतर स्मारक होणार नाही, असा निर्णय घेण्यात आला होता. 

लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या प्रचंड यशात अमित शहा यांच्या व्यवस्थापनाचा महत्त्वाचा वाटा होता. यापूर्वी राज्यसभेत असलेल्या शहा यांनी यंदा गांधीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून शहा लोकसभेवर निवडून आले होते. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहा यांच्याकडे अत्यंत महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या गृहमंत्रालयाची जबाबदारी दिली आहे. 

देशासमोरील महत्त्वपूर्ण प्रश्न हाताळण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आठ महत्त्वाच्या समित्यांमध्येही अमित शहा यांना स्थान देण्यात आले आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा कॅबिनेट समित्यांचा भाग आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात अमित शहा यांचे महत्त्व आणखी वाढणार असल्याची चर्चा आहे.