गृहमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही आहे का? एकनाथ शिंदेंच्या नेत्याने सांगून टाकलं, म्हणाला 'काय हरकत...'

महायुतीच्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे. मात्र असं असलं तरी गृहमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.  

शिवराज यादव | Updated: Dec 3, 2024, 08:55 PM IST
गृहमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही आहे का? एकनाथ शिंदेंच्या नेत्याने सांगून टाकलं, म्हणाला 'काय हरकत...'

महायुतीच्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे. मात्र असं असलं तरी गृहमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप गृहखातं सोडायला तयार नाही आहे. तर शिवसेना गृहखात्यासाठी ठाम आहे..त्यामुळे भाजप-शिवसेनेतील गृहखात्याचा हा कलह शिगेला पोहोचला आहे. यादरम्यान शिवसेना नेते भरत गोगावले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना यावर भाष्य केलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

वर्षा बंगल्यावर मंगळवारी रात्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. दोघांनी जवळपास 50 मिनिटं चर्चा केली. दरम्यान या भेटीनंतर वर्षा बंगल्यावर हजर असणारे शिवसेना नेते भरत गोगावले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना शिवसेना गृहमंत्रीपदासाठी आग्रही आहे का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी मागायला काय हरकत आहे अशी विचारणा केली. 

शिंदे-फडणवीसांमध्ये 50 मिनिटांच्या बैठकीत काय झालं? 'वर्षा'वर हजर शिवसेना नेत्याने केला खुलासा, 'दोघेही...'

 

"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांमध्येच चर्चा होती. इतर कोणीही चर्चेला नव्हतं. आम्ही आत होतो, मात्र दुसऱ्या ठिकाणी बसलेलो होतो. वर आमदारांमध्ये कोणी किती मताने निवडून आलं, कशी मदत झाली यावर चर्चा सुरु होती. आम्ही शिंदे फडणवीस यांच्यातील चर्चा ऐकली नाही. आम्हाला त्यातील काही माहिती नाही," असं भरत गोगावले यांनी सांगितलं. सकाळी ठाण्यात आमची भेट झाली. तिथे तब्येतीची विचारपूस केली आणि तिथून निघालो अशी माहिती त्यांनी दिली. 

संभाव्य मंत्र्यांचा शपथविधी घ्यावा या मागणीसंदर्भात विचारलं असता ते म्हणाले की, "शिवसेना पक्षाच्या वतीने साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल". गृहमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही असल्याबद्दल समजत आहे असं विचारलं असता ते म्हणाले, "हे पाहा, मागायला काय हरत आहे. निर्णयाचे सर्वाधिकार साहेबांकडे आहेत. आम्ही त्यात मध्यस्थी करत नाही आणि करणारही नाही". 

गृहमंत्रीपदावरुन रस्सीखेच

महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला आहे. मुहूर्त ठरला असला तरी गृहमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप आणि शिवसेना दोन्हीही पक्ष गृहमंत्रीपदासाठी आग्रही आहेत. 'मुख्यमंत्रिपद भाजपकडे तर गृहमंत्रिपद आम्हाला पाहिजे असं सांगत शिवसेनेने पुन्हा एकदा गृहमंत्रीपदावर दावा केला आहे. 

महायुतीत गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. स्वतःच्या अनुभवावरुन गृहमंत्रीपद जेवढं चांगलं तेवढंच अडचणीचं असल्याचं सांगायलाही भुजबळ विसरले नाहीत. भाजप आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्रिपद सोडणार नाहीत हे शिवसेना ओळखून आहे. त्यामुळंच गृहमंत्रिपदावर दावा ठोकून आणखी काहीतरी मोठं पदरात पाडून घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न दिसतोय.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More