अमृतसर : पंजाबच्या अमृतसरमधील सरकारी मेडिकल कॉलेज परिसरात मुलींना स्कर्ट, टी शर्ट, जीन्स आणि शॉर्ट्स परिधान करण्यास बंदी घालण्यात आलीयं. प्राचार्या सुजाता शर्मा यांनी यासंदर्भातील परिपत्रक जारी केल असून मुलांनाही जीन्सऐवजी फॉर्मल पॅंट घालण्यास सांगितलं गेलंय. विद्यार्थी या नियमांचे पालन करतात का हे पाहण्याचे सर्व विभागाध्यक्षकांना आदेश देण्यात आले आहेत. 1 ऑक्टोबरपासून हा ड्रेस को़ड लागू होणार आहे. मुलींना सलवार सूट किंवा फॉर्मल ट्राऊजर शर्ट तर मुलांना फॉर्मल शर्टचा वापर करण्यास सांगितलं गेलंय.
क्लासरूम आणि परीक्षा केंद्रावरच हा नियम लागू होणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आलंय. कॉलेज कॅम्पस आणि होस्टेलमध्ये याप्रकारचे कोणते बंधन नसेल असेही स्पष्ट करण्यात आलंय. या नियमांचे पालन न करणाऱ्याविरूद्ध कडक कारवाई करण्याचे कॉलेज प्रशासनातर्फे सांगण्यात आलंय.
जीन्स, टीशर्ट, कॅप्री आणि स्कर्टसारखे कपडे मेडिकल कॉलेजसाठी उपयोगी नाहीत. कॉलेजचे वातावरण अभ्यासाला पोषक राहावे यासाठी नियम बनविल्याचे या परिपत्रकात म्हटलं गेलंय. विद्यार्थ्यांच्या एका गटाने याला विरोध करत हे परिपत्रक मागे घेण्याची विनंती केली पण प्राचार्यांनी असे करण्यास विरोध केला.