पंजाबी सुपरस्टार, गायक दिलजीत दोसांझने जोपर्यंत कॉन्सर्टसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा योग्य प्रकारे विकसित केल्या जात नाहीत तोपर्यंत आपण भारतात एकही कॉन्सर्ट करणार नसल्याचं म्हटलं आहे. 14 डिसेंबरला चंदिगडमधील आपल्या लाईव्ह शोमध्ये दिलजीत दोसांझने ही घोषणा केली आहे. यानंतर दिलजीत दोसांझचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडीओत दिलजीत दोसांझ पंजाबीमध्ये सांगत आहे की, "येथे आपल्याकडे लाईव्ह शोसाठी पायाभूत सुविधा नाहीत. हा मोठा महसूल मिळवण्याचा स्त्रोत आहे. अनेक लोकांना यामुळे काम मिळतं आणि येथे काम करु शकत आहेत. पुढील वेळी मी स्टेज मध्यभागी असेल यासाठी प्रयत्न करेन, जेणेकरुन तुम्ही सर्व प्रेक्षक आजुबाजूला असाल. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत मी भारतात शो करणार नाही हे नक्की".
शनिवारी दिलजीतने चंदीगडमध्ये परफॉर्म केलं. यावेळी त्याने त्याचा दिल-लुमिनाटी कॉन्सर्ट आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचा (FIDE) जागतिक चॅम्पियन झालेल्या गुकेश डोम्माराजूला समर्पित केला. गुकेशने लहानपणापासूनच त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी केलेल्या मेहनतीची आणि समर्पणाची त्याने प्रशंसा केली.
त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. एखाद्याला जीवनात आव्हानांचा सामना करावा लागतो, परंतु ज्याला त्यांचा सामना कसा करायचा हे माहित आहे तो लक्ष्य साध्य करतो असं त्याने यावेळी लिहिलं आहे. दिलजीतने अल्लू अर्जुन स्टारर पुष्पा चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग - झुकेगा नही (झुकेगा नही) चा उल्लेख केला, "साला नही झुकेगा तो क्या जिजा झुक जायेगा," असं त्याने आपल्या स्टाईलमध्ये म्हटलं.
दरम्यान त्याच्या शोआधी, चंदिगड कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सने (CCCPCR) एक अॅडव्हायजरी जारी केली ज्यामध्ये त्याला त्याच्या लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान अल्कोहोल-थीम असलेली गाणी टाळण्याचं आवाहन केले.
गुरुवारी सीसीपीसीआरच्या अध्यक्षा शिप्रा बन्सल यांनी जारी केलेल्या अॅडव्हायजरीत विशेषत: पटियाला पेग, 5 तारा आणि केस या गाण्यांचा संदर्भ देण्यात आला. 29 डिसेंबरला गुवाहाटी येथे परफॉर्म करून दिलजीत भारतातील दौरा संपवणार आहे.