नवी दिल्ली : लांब पल्लाच्या प्रवासासाठी प्रवाशांकडून रेल्वेला पसंती दिली जाते. सुरक्षितपणे आणि वेळेत पोहोचण्याची हमी असल्याने प्रवाशांचा कल रेल्वेकडे असतो. काही वेळेस एखाद्या ठिकाणी जाण्याचा ऐनवेळी बेत ठरतो. अशावेळेस अनेकजण रेल्वेच्या ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून तिकीट काढतात. एकावेळेस एका आयडी वरुन ६ तिकिटे काढण्याची मर्यादा आहे. या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. ही वाढ १२ तिकिटांपर्यंत करण्यात आली आहे. यामुळे आपल्या मित्रमंडळीसोबत किंवा नातेवाईकांसोबत जाणाऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.
आयआरसीटीसीच्या ऑनलाईन तिकीट वेबसाईटवरुन दरमहा १२ तिकीटे काढण्यासाठी तुम्हाला (आयडीधारकाला) आपला आधार नंबर रेल्वे वेबसाईटवरील अकाऊंटला जोडावा लागणार आहे. ही प्रक्रिया फार सोपी आहे. यासाठी तुम्हाला आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर लॉगिन केल्यानंतर my profile या सेक्शनवर क्लीक केल्यानंतर तेथे केवायसी आधार हा पर्याय मिळेल. या ऑप्शनवर क्लीक केल्यावर तिथे आधार नंबर टाकावा लागणार आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक कोड प्राप्त होईल. हा कोड तुम्हाला त्या वेबसाईटवर टाकावा लागणार आहे. यानंतर तुमच्या रेल्वेच्या खात्यासोबत तुमचे आधार जोडले जाईल.
तुम्ही जर तुमच्या रेल्वेच्या आयडीवरुन महिन्यातून ६ पेक्षा अधिक वेळा ऑनलाईन तिकीट काढत असाल, तसेच तुमच्या सोबत कोणी दुसरी व्यक्ती प्रवास करत असेल तर त्याच्या आधारची माहिती देखील ऑनलाईन वेबसाईटद्वारे द्यावी लागेल. तसेच तुमच्यासोबत असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला त्याचा आधार नंबर अद्ययावत करावा लागेल. ही प्रक्रिया एक मेसेजच्या मदतीने पार पडेल. प्रवाशांना ऑनलाईन पद्धतीने जास्तीत जास्त तिकिटे मिळावी, या हेतूने ही मर्यादा वाढवण्यात आली आहे. मर्यादा वाढवल्याने तिकीटांचा काळाबाजार जास्तीत जास्त प्रमाणात रोखण्यास मदत होण्याची आशा लोकांकडून व्यक्त केली जात आहे.