Anand Mahindra Viral Post: महिंद्रा उद्योगसमुहाच्या अध्यक्षपदी असणारे आनंद महिंद्रा कायमच त्यांच्या वेगळेपणासाठी आणि काळानुरुप, नव्या पिढीलाही आपलंसं करणाऱ्या त्यांच्या विचारांसाठी ओळखले जातात. सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी पुन्हा एकदा त्यांच्या पोस्टमुळं अनेकांनाच चर्चेला नवा विषय दिला आहे.
महिंद्रा यांनी हल्लीच एका पोस्टच्या माध्यमातून भगवद् गीतेचं महत्त्वं पटवून दिलं. आपल्या जीवनात योग्य निर्णय घेण्यासाठीचा प्रेरणास्त्रो म्हणून महिंद्रा यांनी गीतेचा उल्लेख केला. अमेरिकी शास्त्रज्ञ आणि अणुबॉम्बचे जनक अशी ओळख असणाऱ्या रॉबर्ट जे ओपनहायमर यांचच एक विधान लिहीत त्यांनी गीतेकडे नेमकं कसं पाहिलं होतं याचीच आनंद महिंद्रा यांनी पुन्हा आठवण करून दिली.
'भगवद् गीता आतापर्यंतच्या ज्ञात भाषांमधील सर्वोत्तम गीत आहे- रॉबर्ट ओपनहायमर. एका महान शास्त्रज्ञानं गीतेचं या भाषेत कौतुक केलं होतं. हे कायम लक्षात ठेवा की अनेकदा तुमच्या अंतर्आत्म्याची साथ मिळाल्यास तर्कशुद्ध विचारही अधिक प्रभावी ठरतात', असं महिंद्रा यांनी लिहिलं.
तर्क आणि भावना यांच्यातील संतुलन कायमच उत्तमोत्तम निर्णय घेण्यासाठी मदत करतात असं आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं. गीतेतील ज्या विचारांनी ओपनहायमरसारख्या शास्त्रज्ञांना प्रेरणा दिली, तेच विचार दैनंदिन जीवनातही विविध अंगानं मार्गदर्शन करताना दिसतात हीच बाब आनंद महिंद्रा यांनी अधोरेखित केली. त्यांनी हे ट्विट करताच नेटकऱ्यांनीसुद्धा त्यांच्या म्हणण्यावर प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं.
"The Bhagavad Gita is the most beautiful philosophical song existing in any known tongue."
- Robert Oppenheimer
One of the most renowned physicists in history revered the Gita.
It’s useful to keep in mind that some of your most rational ideas can be the most impactful when… pic.twitter.com/1vQXPLq2GO
— anand mahindra (@anandmahindra) November 11, 2024
एकिकडे आनंद महिंद्रा यांनी गीतेचं महत्त्वं मांडण्यास सुरुवात केली असतानाच नेटकऱ्यांनीसुद्धा काही वाखाणण्याजोगे संदर्भ मांडले. अल्बर्ट आईन्स्टाईनपासून जगभरातील कैक व्यक्तींसाठी गीता नेमकी कशी मार्गदर्शन करते हेच यानिमित्तानं पाहायला मिळालं. तुमचं याविषयी काय मत?