Anand Mahindra Leopard Photo: बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये कोणी जखमी झालं किंवा कोणाचा मृत्यू झाला यासारख्या बातम्या वरचेवर वाचायला मिळतात. मुंबईमधील आरो जंगलापासून ते ग्रामीण भागांमधील आदिवासी पाड्यांमध्येही बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यांच्या बातम्या समोर येत असतात. त्यामुळेच या हिंसक प्राण्याबद्दल लोकांमध्ये दहशत असते. अनेकांना तर बिबट्याचं नाव ऐकलं तरी अंगाला घाम फुटतो. काही ठिकाणी बिबट्याच्या दहशतीमुळे लोक संध्याकाळी बाहेर पडत नाहीत. महाराष्ट्रच नाही तर देशातील इतर राज्यांमध्येही अशाप्रकारे बिबटे लोकवस्तीमध्ये दिसल्याचे प्रकार अनेकदा घडतात. मात्र सध्या सोशल मीडियावर बिबट्याचा वेगळाच अवतार दाखवणारा फोटो व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रांनीही हा फोटो सोशल मीडियावरुन शेअर केला आहे.
आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये एका डोंगराच्या कपारीमध्ये असलेलं एक छोटं मंदिर दिसत आहे. या मंदिरामध्ये धोतर आणि सदरा घालून एक वयस्कर व्यक्ती देवाची पूजा करताना दिसत आहे. याच डोंगराच्या कपारीत बनलेल्या मंदिराच्या छप्परावर म्हणजेच डोंगरकड्याच्यावरील बाजूस एक बिबट्या बसल्याचं दिसत आहे. हा बिबट्या काहीतरी दूरवरचं पाहत असल्यासारखं वाटत आहे. हा फोटो पाहून नक्कीच कोणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. असेच आश्चर्य आनंद महिंद्रांनाही वाटलं आहे.
हा व्हायरल फोटो राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील जवाई हिल्स येथील असल्याचं सांगितलं जात आहे. या जिल्ह्यामध्ये अशा अनेक लहान मोठ्या टेकड्या आहेत. येथील बेरा गावामधील टेकड्या या पँथर हिल्स किंवा लेपर्ड हिल्स ऑफ इंडिया नावाने ओळखल्या जातात. येथील वैशिष्ट्य म्हणजे येथे बिबट्या आणि मानवामध्ये संघर्ष होताना दिसत नाही. हा फोटो याच गोष्टीचा पुरावा आहे. हा फोटो आनंद महिंद्रांनी 16 मार्च रोजी ट्विटरवरुन शेअर केला आहे. त्यांनी हा फोटो शेअर करताना, "हा फोटो पाहून या क्षणी मला जगातील बॅकिंग क्षेत्राची आठवण का होत आहे?" अशी कॅप्शन दिली आहे. यामधून आनंद महिंद्रांना नेमकं काय सूचित करायचं आहे याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरु असली तरी अनेकांनी यावरुन बँकिंग क्षेत्राला धोका असल्याचं महिंद्रांच्या अध्यक्षांना सूचकपणे सूचवायचं असल्याचा अंदाज बांधला आहे.
Why does this remind me of the world’s banking system at this point in time?? pic.twitter.com/rbJFFPvGWw
— anand mahindra (@anandmahindra) March 16, 2023
या फोटोला 21 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हा फोटो 1200 हून अधिक वेळा रिट्वीट करण्यात आला आहे. हा फोटो 1.6 मिलियनहून अधिकवेळा पाहिला गेला आहे.