अमरावती : आंध्र प्रदेश सरकार 5 सप्टेंबरपासून शाळा सुरु करण्याचा विचार करत आहे. सरकारने यासाठी सर्व आवश्यक तयारीही करण्यास सुरुवात केली आहे. परंतु त्यावेळच्या परिस्थितीच्या आधारे अंतिम निर्णय घेतला जाईल, असं सांगण्यात आलं आहे.
राज्याचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी राज्यातील शिक्षण व्यवस्था पुन्हा सुरु करण्यासाठी बैठक बोलावली होती. बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीनंतर शिक्षणमंत्री आदिमलापु सुरेश यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीत सांगितलं की, शाळा उघडण्यासाठी सरकारने 5 सप्टेंबरची तारीख निश्चित केली आहे, परंतु त्यावेळची परिस्थिती पाहून, त्यावेळीच अंतिम निर्णय घेण्यात येईल.
शिक्षणमंत्र्यांनी असंही सांगितलं की, जोपर्यंत शाळा सुरु होत नाहीत तोपर्यंत मिड-डे मिल अर्थात दुपारच्या जेवणाऐवजी विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी रेशन दिलं जाईल. तसंच, पुढील सत्रापासून प्री-प्राइमरी म्हणजेच एलकेजी आणि यूकेजी (LKG आणि UKG) देखील शाळांमध्ये सुरु केले जातील. राज्यात EAMCET, JEE, IIIT यांसारख्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी कोचिंग क्लासेस सुरु केले जातील. जिल्हास्तरावर संयुक्त संचालक स्तरीय पद तयार केलं जाईल, जेणेकरुन राज्यातील शिक्षणाची पातळी सुधारली जाऊ शकते, अशी माहितीही त्यांनी दिली.
कोरोनामुळे मार्च महिन्यापासून देशातील अनेक राज्यात शाळा, कॉलेज बंद आहेत. कोरोना संसर्गामुळे अनेक परीक्षाही अद्याप होऊ शकलेल्या नाहीत. अनेक राज्यांमध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन वर्ग-शिक्षण घेण्यात येत आहे. मात्र सर्वच विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणासाठीच्या सुविधा नसल्याने यात अनेक अडचणी येत असल्याचं चित्र आहे.