तिरुपती लाडूत प्राण्यांची चरबी आणि माशांचं तेल, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Tirupati Temple Prasad News : आंध्र प्रदेशच्या प्रसिद्ध तिरुपती मंदिरातल्या प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळली जात असल्याचा समोर आल्यानंतर आता केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याकडून अहवाल मागवला आहे.

राजीव कासले | Updated: Sep 20, 2024, 06:15 PM IST
तिरुपती लाडूत प्राण्यांची चरबी आणि माशांचं तेल, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय title=

Tirupati Tirumala Temple Laddu Prasad : आंध्र प्रदेशच्या प्रसिद्ध तिरुपती मंदिरातल्या प्रसादात प्राण्यांची चरबी (Fat) मिसळली जात असल्याचा खुलासा झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर देशभरातून याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. याची गंभीर दखल आता केंद्रानेही घेतली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा (J P Nadda) यांनी शुक्रवारी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांच्याशी फोनवरुन चर्चा करत या प्रकरणाचा अहवाल आरोग्य विभागाला पाठवण्यास सांगितलं आहे. या प्रकरणी योग्य ती चौकशी करुन योग्य कारवाई करण्यास सरकार मागे हटणार नाही असं जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे.

गुजरातच्या लॅबमध्ये तपासणी

आंध्र प्रदेशच्या आधीच्या जगन मोहन यांच्या वायएसआरसीपी सरकारने (YSRCP Government) जगप्रसिद्ध तिरुपति मंदिरातील लाडूमध्ये दर्जाहिन पदार्थ आणि प्राण्यांच्या चरबीचा वापर केला होता, असा आरोप मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता. यानंतर गुजरातच्या प्रयोगशाळेत या प्रसादाची तपासणी करण्यात आली. यात लाडूत प्राण्यांची चरबी आणि माशांच्या तेलाचे अंश सापडल्याचं अहवालात नमुद करण्यात आलं आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर YSR सरकार निशाण्यावर आलं आहे. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी सनातन धर्मरक्षण मंडळाची स्थापना करण्याची मागणी केली आहे.

लाडूत प्राण्यांची चरबी आणि माश्यांचे तेल

चंद्राबाबू नायडू सरकारच्या आरोपानंतर गुजराजतच प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या तपासणीत लाडूमध्ये प्राण्यांची चरबी आणि माशांचं तेल मिसळलं जात असल्याचं सिध्द झालं आहे. याशिवाय लाडूत सोयाबीन, सनफ्लॉवर, ऑलिव, रेपसीड, गहू, मका, नारळ, पाम आईल असल्याचंही या अहवालात सांगण्यात आलं आहे.

राजकीय पडसाद

तिरुपती लाडूत चरबी आणि प्राण्यांचं तेल मिसळ्याचं समोर आल्यानंतर याचे देशभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याकडून सविस्तर माहिती मागवली आहे. याप्रकरणी आंध्र प्रदेश सरकारकडून अहवाल मागवण्यात आला आहे. कायद्याच्या कक्षेत योग्य ती कारवाई केली जाईल, असं जे पी नड्डा यांनी स्पष्ट केलं आहे.

या प्रकरणावर राजकारणही सुरु झालं आहे. काँग्रेस प्रवक्ता पवन खेडा यांनी भाजपवर निशाणा साधत आरोप केला आहे. ज्या YSRCP वर भाजप आरोप करतंय त्यांचं गेल्या पाच वर्षात भाजपनेच सर्मथन केलं होतं, अनेक मुद्द्यांवर भाजप आणि YSR ने एकमेकांना पाठिंबा दिला होता. काँग्रेसचे माजी खासदार संदीप दीक्षित यांनीही याप्रकरणाची चौकशी करत लाडू बनवण्याचं कंत्राट कोणाला मिळालं होतं याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. केंद्रीय मंत्री गिरिराज किशोर यांनी हा हिंदुंच्या श्रद्धेचा विषय असल्याचं सांगत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

तिरुपतीचा प्रसाद जगभरात प्रसिद्ध

तिरुपती तिरुमाला मंदिराच्या प्रसादात लाडू दिला जातो. प्रसादाशिवाय दर्शन पूर्ण होत नाही असं मानलं जातं. या लाडूला आंध्रत लड्डू पोटू असं म्हटलं जातं. दररोज जवळपास आठ लाखाहून अधिक लाडू बनवले जातात.