दिल्लीमध्ये भीषण अपघातात 19 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. तरुण दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी होता. अपघात इतका भीषण होता की, लोखंडी रेलिंग कारमधून आरपार गेलं होतं. ऐश्वर्य पांडे असं पीडित तरुणाचं नाव असून मित्रांसह वाढदिवसाची पार्टी केल्यानंतर तो घरी परतत होता. गुरुग्राम येथून घऱी परतत असताना त्याच्या कारचा अपघात झाला आहे. यावेळी त्याचे चार मित्रही कारमध्ये होते, जे जखमी झाले आहेत.
देशबंधू कॉलेजचा बीए प्रथम वर्षाचा विद्यार्थी असलेल्या पांडेला एलएनजेपी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्याला वेंटिलेशन सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. गुरुवारी रात्री उशिरा त्याचं निधन झालं. सूत्रांच्या माहितीनुसार, हे सर्व विद्यार्थी मद्यावस्थेत होते.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयशी संवाद साधताना दिलेल्या माहितीनुसार, "बुधवारी ऐश्वर्य पांडेचा वाढदिवस होता. त्याने मित्रांसाठी पार्टीचं आय़ोजन केलं होतं आणि कार भाड्याने घेतली होती. त्याने कार आपल्या मित्राला चालवण्यासाठी दिली होती". ऐश्वर्य पांडे चालकाच्या मागे बसला होता आणि गंभीर जखमी झाला.
#WATCH | 5 people including 4 students of Delhi University suffered injuries and were admitted to hospital after their car met with an accident in the Shantivan area of Delhi. They were returning from Gurugram after celebrating the birthday of one of the injured. Initial… pic.twitter.com/Yjew3mGfk8
— ANI (@ANI) September 19, 2024
पांडे हा उत्तर प्रदेशच्या इटाह येथील रहिवासी होता. दिल्लीमधील लक्ष्मीनगरमध्ये तो हॉस्टेलमध्ये राहत होता. त्याच्या पालकांचं निधन झालं आहे. "त्याने त्याचे वडील गमावले आहेत. ते एका खासगी कंपनीत कामाला होते. आजारपणामुळे त्यांचं निधन झालं. तसंच शिक्षिका असणारी त्याची आई रस्ते अपघातात मृत्यू पावली होती," असं त्याच्या नातेवाईकाने सांगितलं आहे. दरम्यान पांडेचा मित्र मिश्रा हादेखील गंभीर जखमी असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे. खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
पोलिस उपायुक्त (उत्तर दिल्ली) एमके मीना यांनी सांगितले की, भारतीय न्याय संहिता कलम 281 (रॅश ड्रायव्हिंग) आणि 125 (अ) (इतरांच्या वैयक्तिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कृतीमुळे दुखापत करणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे. अपघाताचे खरे कारण शोधण्यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न केला जात आहे.