नवी दिल्ली : लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे अनिश्चित काळासाठी उपोषणाला बसत आहेत. आजपासून दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानात हे उपोषण होत आहे. २०११ मध्ये भ्रष्टाचार विरोधासाठी याच मैदानात ते उपोषणाला बसले होते. यावेळेसे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपा सरकारवर निशाणा साधतील. शहिद दिनानिमित्त शहिदांच्या स्मारकाला श्रद्धांजली अर्पण करुन अण्णा उपोषणाला सुरूवात करतील.
हजारे यांचा केंद्र सरकारविरोधात पुन्हा एल्गार केलाय. अण्णांनी त्रेचाळीस वेळा पत्र पाठवूनही दखल घेण्यात आलेली नाही. परदेश दौऱ्यात व्यस्त असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ नसल्याची टीका, यावेळी अण्णा यांनी केली.
आपण लोकांसाठी आंदोलन करत आहे. हार्ट ॲटॅक येऊन मरण्यापेक्षा देशासाठी मरणं चांगलं, म्हणून उपोषण करणारच, असा निर्धार अण्णा हजारे यांनी केलाय. लोकपालची अंमलबजावणी आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला उत्पन्न खर्चाच्या दीडपट हमी भाव मिळावा यासाठी आंदोलन हे आंदोलन आहे, असे अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान,यावेळी आंदोलनात सहभागी होणाऱ्यांकडून राजकारणात जाणार नाही, अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र लिहून घेणार आहोत, असे अण्णा यांनी स्पष्ट केले. याआधीची टीम अण्णा फुटली किंवा ती फोडण्यात आली. ती फुटली नसती तर देशाचं चित्र खूप सुंदर राहिलं असंतं. टीम अण्णा फुटल्यामुळं देशाचं नुकसान झालं, अशी खंत हजार यांनी व्यक्त केली.