Air India Cabin Crew Crisis : टाटा समूहाच्या एअर इंडिया एक्स्प्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडताना दिसतायत. यावेळी एअर इंडियाच्या शेकडो कर्मचारी 7 मे रोजी रात्री अचानक रजेवर गेले. यानंतर एअर इंडिया एक्सप्रेसने मोठं पाऊल उचलून जवळपास 25 कर्मचाऱ्यांना तातडीनं बडतर्फ करण्यात आलं होतं. मात्र आता याचं कर्मचाऱ्यांबाबत एअर इंडियाने यु-टर्न घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 'एअर इंडिया एक्सप्रेस' ने अनेक केबिन क्रू कर्मचाऱ्यांना जारी केलेले टर्मिनेशन लेटर मागे घेण्याचं मान्य केलंय. एअर इंडिया एक्सप्रेसचे अनेक कर्मचारी एकत्र आजारी रजेवर गेले होते. यावेळी सुमारे 300 केबिन क्रू मेंबर्सनी अचानक आजारी पडल्याची माहिती कंपनीला दिली हो. याच कारणामुळे कंपनीला अनेक उड्डाणे रद्द करावी लागली. प्रवाशांना झालेल्या नाहक त्रासामुळे तसंच नियुक्तीच्या अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आलाय.
कंपनीने केलेल्या कारवाईनंतर वरिष्ठ केबिन क्रू मेंबर्सनी आपल्या मागण्यांबाबत संप पुकारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा होऊन अंतिम निर्णय घेण्यात आला. विमान कंपनीने टर्मिनेशन लेटर मागे घेण्याचे मान्य केलं आहे. याशिवाय दुसरीकडे केबिन क्रूनेही संप मागे घेतला आहे. कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांवर विचार करण्यासाठी विमान कंपनीला वेळ दिला असल्याची माहिती आहे.
दरम्यान यासंदर्भात नागरी उड्डाण मंत्रालयाने एअर इंडिया एक्सप्रेसच्या उड्डाणे आणि रद्द करण्याच्या विलंबाची दखल घेतलीये. या संदर्भात एअर इंडिया कंपनीकडून अहवाल मागवण्यात आला आहे. माहितीनुसार, मंत्रालयाने कंपनीला ताबडतोब समस्या सोडवण्याचं आवाहन केलंय.