श्रीनगर: काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी औरंगजेब या भारतीय जवानाची अपहरण करुन हत्या करण्यात केली होती. ईदच्या सणासाठी घरी जात असताना दहशतवाद्यांनी औरंगजेबवर पाळत ठेवून त्याचे अपहरण केले होते. या घटनेला एक महिना उलटून गेल्यानंतर औरंगजेबचे मित्र व नातेवाईक त्याच्या सलानी गावातील घरी जमले होते.
यावेळी औरंगजेबच्या ५० मित्रांनी आपल्या मित्राच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्करात दाखल होण्याचा निर्णय घेतला. हे सर्वजण आखाती देशांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या करत आहेत. मात्र, औरंगजेबच्या मृत्यूनंतर या सर्वांनी सुखासीन आयुष्य लाथाडून देशसेवेसाठी पोलीस आणि लष्करात दाखल व्हायचे ठरवले आहे.
आम्ही औरंगजेबच्या मृत्यूची बातमी ऐकली तेव्हा आम्ही सर्वजण लगेचच भारतामध्ये परतलो. सौदीत अशाप्रकारे अचानक नोकरी सोडता येत नाही. मात्र, आम्ही ५० जणांनी तसे केले. औरंगजेबच्या मृत्यूचा बदला घ्यायचा, या एकाच उद्देशाने आम्ही भारतात परत आल्याचे मोहम्मद किरमत याने सांगितले.